शंभूराज देसाईंनी भरविला पृथ्वीराज चव्हाणांना कंदीपेढा
कराड प्रतिनिधी K P ऑनलाइन
आमदार शंभूराज देसाई यांनी राज्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच कराडला भेट दिली. यावेळी मंत्री देसाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या पाटण कॉलनीतील निवासस्थानी भेट दिली. दोघा नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली तसेच देसाई यांनी चव्हाण यांना सातारी कंदीपेढा भरवून आनंद व्यक्त केला.
कै. बाळासाहेब देसाई यांच्याप्रमाणेच त्यांचे नातू शंभूराज देसाई हेही मंत्रीपदाच्या कार्यकाळात आपला वेगळा ठसा उमटवतील, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
शंभूराज देसाई हे गेली दोन दिवस साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पाटण मतदारसंघातील जनतेच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
येथे शंभूराज देसाई यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी मंत्री देसाईंचे औक्षण केले.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शंभूराज यांना त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांच्यानंतर जवळपास तीन दशकानंतर मंत्रीपद मिळाले आहे. माझे मुळगाव कुंभारगाव हे पाटण तालुक्यातीलच आहे. तसेच कै. बाळासाहेब देसाई हे माझ्या वडिलांसोबत संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी होते. राज्यातील राजकारणातही कै. बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.
त्यांनी राज्य सरकारमध्ये शिक्षण, कृषी, गृह आदी प्रमुख खाती सक्षमपणे सांभाळली होती. कै. बाळासाहेब देसाई यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत जी कामे केली त्याची नोंद आजही घ्यावी लागते. त्यांच्यासारखे सक्षमपणे त्यांचे नातू शंभूराज देसाई हे आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात वेगळा ठसा उमटवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष झाकीर पठाण, कऱ्हाड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, प्रदीप जाधव, नगरसेवक इंद्रजित गुजर, सुनील बरिदे, दिलीप देशमुख, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण, सतीश पाटील आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा