कुंभारगाव (ता.पाटण,जि. सातारा) :
राज्याचा राजकीय इतिहास ज्या ज्यावेळी लिहिला जाईल. त्या त्यावेळी स्वच्छ कारभार करणारे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराजबाबांचेही नाव अग्रक्रमाने पुढे येईल अशा शब्दात गृहराज्य मंत्री शंभूराज देसाईंनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक केले.
कुंभारगाव (ता. पाटण)येथे आयोजित कार्यक्रमात देसाई बोलत होते. तुमच्यामुळेच मी आमदार आणि मंत्री बनलोय याची जाणीव मला आहे. राज्यात कुठेही असलो तरी घारीचे चित्त तिच्या पिलांपाशीच असते एवढेच तुम्ही ध्यानात ठेवा', सांगत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गृहराज्यमंत्रीपदी निवडीबद्दल कुंभारगाव येथे शंभूराज देसाई यांचा सत्कार झाला.
देसाई म्हणाले,' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे. आपापल्या खात्याचे कामकाज समजावून घेवून लोकाभिमुख कारभार करा. वचननाम्याची तंतोतंत पूर्तता करण्याची जबाबदारी मंत्री मंडळाची आहे.
ही त्यांची अपेक्षा शिस्तबद्ध शिवसैनिक म्हणून मी पूर्ण करेन आणि त्यांनी टाकलेली जबाबदारी सक्षमपणे पेलेन. कामाचा कितीही ताण असला तरी मतदार संघातील संपर्क मी कधीही कमी होवू देणार नाही.मला तुम्ही जनतेनेच आमदार केले आहे, आमदार झालो नसतो तर मंत्रीही दिसलो नसतो. मतदार संघासाठी जेवढा जास्त वेळ देणे शक्य आहे तेवढा मी देईन.
लोकने ज्या े बाळासाहेब देसाई यांनी ज्या खात्याचा कारभार समर्थपणे पेलला त्याच खात्याची जबाबदारी योगायोगाने माझ्याकडे आली आहे,मी त्यांच्यासारखे काम करेन असे म्हणणार नाही परंतु त्यांच्या रक्ताचा आणि राजकीय विचारांचा वारसदार या नात्याने लोकनेत्यांच्या विचारांशी साजेसे काम नक्कीच करेन असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार होता. मात्र श्री. चव्हाण यांना पक्षाच्या महत्वाच्या कामानिमित्ताने दिल्लीला जावे लागले. तसेच बाळासाहेब पाटील सह्याद्री कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेमुळे कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा