वसा दुर्गस्वच्छतेचा!
महाराष्ट्र म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! या वीरभूमीची शान असलेल्या सह्याद्रीच्या रांगेत असंख्य किल्ले उभे राहिले. सातवाहन काळापासून शिवकाळापर्यंत असंख्य किल्ल्यांनी महाराष्ट्राचा इतिहास प्रेरणादायी केला. हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र आज या साऱ्या ठेव्याला घाण, कचऱ्याचा वेढा पडला आहे. गडांवरचे हे अराजक दूर करण्याचा निश्चय ‘जय स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र नगर मानखुर्द ’ या संस्थेने केला आणि २९डिसेंबर रोजी शिवनेरी गडावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.
शिवनेरी किल्ल्यावर चार ते पाच तास झालेल्या या साफ-सफाईत प्लास्टिकच्या पिशव्या, पाकिटे, बाटल्या गोळा करण्यात आल्या. या किल्ल्यावर अशी सहा ते सात पोती कचरा जमा करण्यात आला. या कचऱ्यात मद्याच्या बाटल्यांचे प्रमाण मोठे होते. हा कचरा गोळा करण्यात युवक पुढाकार घेत असताना ही घाण करण्यातही गडावर जाणारे तरुणच आघाडीवर असल्याची खंत या संस्थेचे संस्थापक दत्तात्रय डोगळे अध्यक्ष बबन सुर्वे यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाने गड-किल्ल्यांचे जतन करण्यास आम्ही असमर्थ असल्याची कबुली न्यायालयात दिली असतानाच, शिवप्रेमाने भारावलेल्या तरुणाईच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा