मुंबई प्रतिनिधी : 23 डिसेंबर 2019
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असताना काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांची आधी मंत्रिपदासाठी चर्चा होती. मात्र आता काँग्रेसकडून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन एक महिना पूर्ण होत आला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. खातेवाटपावरून काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात सामावून घेताना कोणतं खातं द्यायचं, असा पेच काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवायची की पृथ्वीराज चव्हाण यांना नेमायचे याबाबत अजून अंतिम निर्णय येणं बाकी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा