गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

काळगाव - डाकेवाडीत स्वतःच्या घरातच उभारले वाचनालय.

 डाकेवाडीत स्वतःच्या घरातच उभारले वाचनालय.


 


तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील समाजशील व्यक्तिमत्त्व राजाराम विठ्ठल डाकवे (तात्या) यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त डाकवे परिवाराने स्वतःच्या घरात वाचनालय सुरु केलेे आहे. यातील बरीचशी पुस्तके स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या विविध कार्यक्रम आणि स्पर्धात्मक उपक्रमात जमा झाली होती. त्याचे अनौपचारिक उद्घाटन शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, सेवानिवृत्त पोलीस ऑफीसर संभाजीराव पाटणकर, प्रा.ए.बी.कणसे, देवबा वायचळ, ग्रामीण लेखक ज्ञानदेव मस्कर, शिवम् असोसिएटसचे गुलाब जाधव (फौजी), नितीन पाटील, अक्षय पाटील, आप्पासोा निवडूंगे, जगन्नाथ टेळे, कृष्णा डाकवे, विठ्ठल डाकवे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
समाजामध्ये वाचनसंस्कृती रुजावी, सुजाण सुसंस्कृत नागरीक घडावेत असा उदात्त हेतू ठेवून डाकवे परिवाराने स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वाचनालयाची उभारणी केली आहे. चाफळ (ता.पाटण) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी त्यांच्याजवळील नामवंत लेखकांची 100 पुस्तके भेट दिली आहेत. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई आणि आ.जयंत पाटील यांनी लेख शुभसंदेश तर साताऱ्याचा चाॅकलेट हिरो आकाश पाटील यांनी व्हिडीओ क्लिप शेअर करत वाचनालयाला शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी डाकवे परिवाराने मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार असे वाचन चळवळीला हातभार लावणारे उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे. वाचन चळवळीसाठी अनोखे पाऊल उचलेल्या डाकवे परिवाराच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांनी राजाराम डाकवे (तात्या) यांच्या प्रतिमेचे दर्शन घेवून आदरांजली वाहिली. तात्यांच्या आकस्मिक निधनाने एक धडपडया, सामाजिक बांधिलकी जपणारे अनमोल रत्न हरपल्याची भावना यावेळी लोकांनी व्यक्त केली. तसेच डाकवे परिवाराने तात्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवलेल्या सर्व उपक्रमाचे कौतुक करत त्यांचा आदर्श इतरांनी घेण्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
त्यानंतर सायंकाळी डाकेवाडीतील स्थानिक भजनी मंडळांने अप्रतिम भक्तीमय गीतांचे सादरीकरण केले. सुर्यकांत डाकवे (हार्मोनियम), लक्ष्मण डाकवे (मृदंगमणी), वसंत डाकवे, विणेकरी महादेव डाकवे, चोपदार पांडूरंग जाधव, तुकाराम चव्हाण, नंदा मस्कर, मीना डाकवे, शामराव डाकवे, लक्ष्मण मस्कर, काशिनाथ डाकवे, सुनंदा डाकवे, शंकर डाकवे, कलाबाई डाकवे, आनंदा घाडगे, पांडूरंग डाकवे, तानाजी डाकवे, लक्ष्मण डाकवे, दत्तात्रय डाकवे इ.च्या सहभागाने या भजनाची उंची अधिकच वाढली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गयाबाई डाकवे, रेश्मा डाकवे, डाकवे, पारुबाई येळवे, सविता निवडूंगे, रत्नाबाई काळे, भरत डाकवे, सुनील मुटल, जिजाबाई मुटल, लक्ष्मी डाकवे, अनुसया डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, स्पंदन डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

: वडिलांच्या आठवणी सदैव जपण्याचा प्रयत्न :
रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ.पुस्तकांची प्रकाशने, साहित्य पुरस्कार, चित्रकला स्पर्धा, सार्वजनिक वाचनालय इ.उपक्रम राबवत वडीलांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे डाॅ.संदीप डाकवे आणि डाकवे परिवाराने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...