रविवार, २ जून, २०२४

*राज्यातील दुष्काळाबाबत सरकार निद्रिस्त अवस्थेत - पृथ्वीराज चव्हाण यांची टीका*

 *राज्यातील दुष्काळाबाबत सरकार निद्रिस्त अवस्थेत - पृथ्वीराज चव्हाण यांची टीका* 

 *कराड* : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असून पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट होत आहे. चारा नसल्याने शेतकऱ्यांना जनावरे विकावी लागत आहेत. फळबागा करपून गेल्या आहेत. अनेक शहरांना 15 दिवसांनी पाणी मिळत आहे. एवढी भयंकर परिस्थिती असताना सरकार मात्र दुष्काळाबाबत निद्रिस्त अवस्थेत असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. दुष्काळाच्या परिस्थितीबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी आज आ. चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली. या मीटिंग नंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी समितीमधील सदस्य माजी मंत्री सतेज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. संजय जगताप, आ. विक्रमसिंह सावंत, आ. राजू आवळे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे, सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यावेळी उपस्थित होते. 

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विभागवार दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली असून पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. या समितीमध्ये एकूण १३ सदस्य आहेत. हे सर्व सदस्य लोकप्रतिनिधी असून त्यांच्या जिल्ह्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते त्यानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग संपन्न झाली. या मीटिंगमधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती सदस्यांनी दिली. सद्य स्थितीला प्रत्येकच जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ आचारसंहितेबाबत ठोस निर्णय घेऊन निवडणूक आयोगाला विनंती करून राज्यामधील दुष्काळी परिस्थितीची माहिती व्यवस्थित देऊन आचारसंहिता शिथिल करण्याबाबत प्रयत्न करावेत. 

येत्या दोन दिवसातच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यात समिती सदस्यांसोबत दौरा काढून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. याबाबत दौऱ्याचा आराखडा सुद्धा तयार करण्यावर या मिटिंगमध्ये चर्चा झाली. विरोधी पक्ष म्हणून दुष्काळाची दाहकता सरकारला अजून समजलेली दिसत नसल्याने वेळकाढू भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. राज्यातील शेतकरी, तसेच त्यांची जनावरे पाण्याविना तडफडत आहेत. शेतीच्या पिकाला पाणी नाही, शेकडो गावामध्ये तसेच शहरामध्ये १५ दिवसातून पाणी येत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी महाराष्ट्र काँग्रेस तत्पर असेल अशी माहिती आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...