तात्यांची स्पंदने’ ई-बुक ला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
तळमावले/वार्ताहर
‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुक ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी शुभेच्छा देवून पुस्तकाच्या अभिप्रायाचे ई-बुक या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले आहे. या ई-बुक चे प्रकाशन मंगळवार दि.9 जानेवारी, 2024 रोजी होणार आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधत ‘तात्या’ हे पुस्तक लिहून वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आलेल्या अभिप्रायाचे ई-बुक करण्याचा संकल्प लेखक डाॅ.संदीप डाकवे यांनी केला. या ई-बुकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा संदेश देवून या पुस्तकाचा एकप्रकारे गौरवच केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, ‘‘डाॅ.संदीप डाकवे ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुकचे प्रकाशन करत असल्याचे समजून आनंद झाला.
‘तात्या’ या पुस्तकासंदर्भातील वाचकांचे लेखी अभिप्राय ‘तात्यांची स्पंदने’ या ई बुकमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. अभिप्रायाचे ई-बुक हा साहित्य क्षेत्रातील वेगळा उपक्रम आहे. यामुळे वाचकांना सहज अभिप्राय देणे शक्य होईल. ‘तात्या’ हे पुस्तक उपेक्षित शेतकरी वर्गाचं नेतृत्व करणारे तसेच आहे त्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकताना आपल्या मुलांना एक मार्गदर्शक बनून त्याला उत्तम ‘माणूस’ म्हणून घडवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या एका बापाची कहाणी आहे.
‘तात्या’ पुस्तकाला राज्यस्तरीय ‘स्वदेशी भारत सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला. ही प्रशंसनीय बाब आहे. ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुकच्या प्रकाशनास मनःपूर्वक शुभेच्छा..!
मान्यवरांच्या शुभसंदेशाबरोबरच ग्रामीण कथाकार शिवाजी मस्कर, पत्रकार सुनील शेडगे, प्रकाश सकुंडे, सौ.सीमा देसाई, संपादक भिमराव धुळप, अरुणा शेवाळे, प्रा.नंदकुमार शेडगे, ग्रामीण कथाकार सत्यवान मंडलिक, आनंदा ननावरे, विजयकुमार भंडारे, सुनील पवार, डाॅ.स्वाती अनिल मोरे, प्रा.पी.आर.सावंत, शीघ्रकवी विशाल डाकवे, यशोमती देसाई, संदिप वंडूस्कर, डाॅ.राजेंद्र कंटक, दीक्षित डी.एस., अंकुश सावंत, निलेश मोहिते, ज्येष्ठ पत्रकार आनंदराव पवार, मारुती ढगे अशा तब्ब्ल 23 मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देवून ‘तात्या’ या पुस्तकाला खऱ्या अर्थाने गौरवांकित केले आहे. या सर्वांच्या प्रतिक्रियांची सुंदर मांडणी ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुक मध्ये केली असून त्यांचे पुर्ण नाव, पत्ता आणि फोटोही छापण्यात आले आहेत. 11 शुभसंदेश आणि 23 प्रतिक्रियांनी नटलेले 60 पानांचे हे ई-बुक प्रत्येकाने वाचायलाच हवे. या ई-बुकचे आकर्षक मुखपृष्ठ आणि आतील रंगीत पानांची मांडणी सुप्रसिध्द कॅलिग्राफर बाळासाहेब कचरे यांनी केली आहे. पुस्तकाच्या आतील पानांवर परडयात झालेल्या अनोख्या पुस्तक लोकार्पणाचा फोटो, पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराचा फोटो आणि पुस्तकासंबंधी प्रकाशित झालेल्या बातम्यांची सुंदर रचना केली आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘तात्या’ पुस्तकाच्या अभिप्रायाचे ‘तात्यांची स्पंदने’ हे ई-बुक तयार करुन साहित्य क्षेत्रात अभिनव संकल्पना सुरु केली असून त्याचे साहित्यिकांकडून कौतुक होत आहे.
मान्यवरांचे शुभसंदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभसंदेशासोबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.जयंत पाटील, आ.प्रा.वर्षा गायकवाड, सुप्रसिध्द साहित्यिक व व्याख्याते डाॅ.यशवंत पाटणे, संपादक चंद्रकांत चव्हाण, ज्योतिषाचार्य आबासाो दिंडे, नगरपालिका नगरवाचनालय कराड, सह्याद्री मोफत वाचनालय मल्हारपेठ, युवा साहित्य समाज वाचनालय मालदन इत्यादी मान्यवरांचे शुभसंदेश यात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा