गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

जादूटोण्याचा प्रकार आढळल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधा---- सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे

जादूटोण्याचा प्रकार आढळल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधा

---- सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे

 

सातारा दि. 24 : आपल्या आसपास कुठेही अमानुष, अघोरी प्रथा, जादुटोण्याचे प्रकार अथवा नरबळीसारख्या गंभीर घटनांचा संशय आल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा नितीन उबाळे यांनी केले आहे.

 

                       

                        भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला दोराने अथवा साखळीने बांधून मारहाण करणे, त्या व्यक्तीला छताला टांगणे, काठीने अथवा चाबकाने मारणे, मिरचीची धुरी देणे,  शरीरावर किंवा अवयवावर तापलेल्या वस्तूचे चटके देवून इजा पोहोचविणे आदी अघोरी कृती करणे, तसेच नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांचा प्रचार करणे किंवा ते प्रसिद्ध करणे अशा अपराधांसाठी दोषी असलेली व्यक्ती दोष सिद्ध झाल्यानंतर 6 महिने कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच 7 वर्षे कारावास व 50 हजार रुपये दंड असून हा अपराध  दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील, अशी तरतूद महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतच्या अधिनियमामध्ये करण्यात आलेली आहे.

 

            तसेच एखाद्या व्यक्तीचे बाबतीत अपराध घडल्यास अथवा निदर्शनास आल्यास यासंदर्भातील गुन्हा नोंदविण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये दक्षता अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हे दक्षता अधिकारी असतील. त्यांना स्वत: तक्रार दाखल करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.

 

                समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट, अमानुष आणि अघोरी प्रथा, जादुटोण्याचे प्रकार, नरबळी आदींबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जागरुकता निर्माण करण्याचे काम केले जाते. समाजातील अज्ञानामधून निर्माण झालेल्या गैरसमजूतींमुळे सरतेशेवटी समाजाचेच नुकसान होते. जादूटोणा, अनिष्ट प्रथांचे प्रकार आपल्या आसपास आढळून आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा श्री. नितीन उबाळे यांनी केले.

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कराडमध्ये विविध विकासकामांची भूमिपूजन व उदघाट्न होणार* *- 25 नोव्हेंबर रोजी होणार उदघाटन कार्यक्रम*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कराडमध्ये विविध विकासकामांची भूमिपूजन व उदघाट्न होणार* 

- 25 नोव्हेंबर रोजी होणार उदघाटन कार्यक्रम

- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नवीन शासकीय विश्रामगृह यांचे उदघाट्न तसेच कृष्णा नदीवरील रेठरे व पाचवडेश्वर-कोडोली नवीन पुलाचे भूमिपूजन

 *कराड*: 25 नोव्हेंबर रोजी कराड दक्षिण मधील विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच भूमिपूजन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून त्यांचे हस्ते प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण तसेच शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन व कृष्णा नदीवरील रेठरे व पाचवडेश्वर-कोडोली नवीन पुलाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मध्ये विविध विकास कामे झाली आहेत. मुख्यमंत्री असतानाच्या काळात व त्यानंतरही या विकास कामांची कार्यवाही व इतर कामे सुरू आहेत. आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरात भव्य प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालय बांधण्यात आले. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा तसेच नवीन विश्रामगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच रेठरे येथिल नवीन पुलाचे भूमिपूजन व पाचवडेश्वर कोडोली दरम्यान होणाऱ्या नवीन पुलाचे भूमिपूजन ही मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त समाधी स्थळावर श्रद्धांजली कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरील या चार कामांचा शुभारंभ व भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.

----------------------------------------

*पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावासातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विशेष विकास निधी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विशेष विकास निधी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २२:  सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विकास निधी, वांग मध्यम प्रकल्प कोयना भूकंपग्रस्तांच्या वारसांना दाखले देणे आदी विविध विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीस उत्पादनशुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भूसे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई, कोरेगाव, खटाव व खंडाळा हे आठ पूर्णगट तालुके तसेच माण, फलटण, कराड हे तीन उपगट तालुक्यांचा डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत समावेश होतो. वित्त विभागाकडून त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येत असून विशेष निधी देण्याची मागणी मंत्री श्री. देसाई यांनी केली. त्यावर हा निधी देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया जिल्हा प्रशासनासने पूर्ण करून त्याबाबतचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवावा. डोंगरी विभाग विकास कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोयना भूकंपग्रस्तांच्या वारसांना भूकंपग्रस्त दाखले तातडीने देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पाटण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या वाढीव कामासाठी निधी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

पाटणच्या मायभूमीत सेलिब्रिटींचे अक्षरगणेशा देवून स्वागत

पाटणच्या मायभूमीत सेलिब्रिटींचे अक्षरगणेशा देवून स्वागत
तळमावले/वार्ताहर
सिने क्षेत्रासह विविध टीव्ही मालिकेतील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ‘‘शंभुदौलत जल्लोष’’ या कार्यक्रमासाठी आले होते. या सेलिब्रिटींना अक्षरगणेशा देवून त्यांचे स्वागत विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी केले. या अनोख्या व आपुलकीच्या भेटीमुळे सर्व सेलिब्रिटी भारावून गेले. सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, अभिनय बेर्डे, कविता राम, मयुरेश पेम, गौरव मोरे, हिना पांचाळ, वनिता खरात, मीरा जोशी, विद्या सदाफुले, आकांक्षा कदम, राहुल सक्सेना या सेलिब्रिटींना त्यांच्या नावातील अक्षरगणेशा देण्यात आला. याप्रसंगी प्रदीप माने, जीवन काटेकर, छायाचित्रकार शंभूराज देसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते.
 डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत 13 हजार पेक्षा जास्त मान्यवरांना आपली चित्रे भेट दिली आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मिळणाऱ्या मानधनातून गरजूंना रोख स्वरुपाची आर्थिक मदत केली आहे. कलेतून आत्मसमाधान आणि सामाजिक बांधिलकी हे सुत्र डॉ. संदीप डाकवे यांनी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
यापूर्वी डॉ.डाकवे यांनी नाना पाटेकर, रविंद्र बेर्डे, डाॅ.अमोल कोल्हे, अशोक सराफ, सयाजी शिंदे, भरत जाधव, अषोक शिंदे, मकरंद अनासपुरे, जयराज नायर, अविनाश नारकर, डाॅ.गिरीश ओक, संजय नार्वेकर, भाऊ कदम, सिध्दार्थ जाधव, मंगेश देसाई, दिपक शिर्के, मकरंद देशपांडे, अभिजित खांडकेकर, सुबोध भावे, सागर कारंडे, अतुल परचुरे, किरण माने, ऐश्वर्या नारकर, प्राजक्ता माळी, स्पृहा जोशी, तेजा देवकर, प्रार्थना बेहरे, अनिता दाते आदि नामवंत व दिग्गज सेलिब्रिटींना चित्रे व अक्षरगणेशा भेट दिला आहे.  
मुळच्या चिचांबा माटेकरवाडी येथील असलेल्या आणि चंदेरी दुनियेत आपल्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या सुप्रसिध्द गायिका कविता राम यांनी पाटणच्या मायभूमीत आलेल्या सेलिब्रिटींना अक्षरगणेशा देण्याची तसेच त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी विशेष सहकार्य  केल्याचे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले. 

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांच्या भगिनी तसेच शिवसमर्थ चे व्यवस्थापक श्री.नितीन दिनकर पाटील यांच्या मातोश्री सौ.कमल दिनकर पाटील यांचे शुक्रवार दि.18 नोव्हेंबर, 2022 रोजी व्दितीय पुण्यस्मरण येत आहे. त्यानिमित्त्त त्यांच्याबद्दल थोडंसं...प्रेमाची सावली - सौ.कमल दिनकर पाटील

शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांच्या भगिनी तसेच शिवसमर्थ चे व्यवस्थापक श्री.नितीन दिनकर पाटील यांच्या मातोश्री सौ.कमल दिनकर पाटील यांचे शुक्रवार दि.18 नोव्हेंबर, 2022 रोजी व्दितीय पुण्यस्मरण येत आहे. त्यानिमित्त्त त्यांच्याबद्दल थोडंसं...

प्रेमाची सावली - सौ.कमल दिनकर पाटील
काही माणसं कर्तृत्वापेक्षा आपल्या स्वभावामुळे लोकांच्या मनात कायमची घर करुन राहतात. त्यांचे वागणे हेच त्यांचे कर्तृत्व असते. अशीच एक व्यक्ती म्हणजे माझ्या सासुबाई सौ.कमल दिनकर पाटील. दोन वर्शापूर्वी त्यांच्या आकस्मिक जाण्याची बातमी ऐकताच डोळ्याातील अश्रूंनी आपली वाट आपोआप रिकामी केली. त्यांच्या अनेक आठवणी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. मुळात माझ्या सासुबाई मितभाषी होत्या. कुणाशी जास्त बोलत नसत. घरातल्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. घरामध्ये कोणीही व्यक्ती आली तर त्याला तांब्याभर चहा आणि एक कप चहा दिल्याशिवाय गेलेली व्यक्ती मला तर आठवत नाही. स्वतः आजारी नसलेली व्यक्ती दुसऱ्याबरोबर व्यवस्थित बोलेल, गप्पा मारील, त्याचा पाहुणचार व्यवस्थित करेल पण ज्यांच्या जगण्याला औषधाचीच कायम साथ लाभली त्या माझ्या सासुबाई लोकांना चहापाणी देताना आपले दुःख नेहमी विसरलेल्या जाणवल्या. इतरांसाठी त्यांचे आजारपण कधीही आड आले नाही. नेहमी इतरांशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य जाणवत असे. आलेल्या प्रत्येक संकटाला जणू हसतमुख सामोरे गेले पाहीजे याचे त्या संदेश देत आहेत असे मला वाटते.
आपल्या आयुष्यात त्यांनी कधी कुणाला दुखावले नाही किंवा एखाद्याला उलट प्रतिउत्तर दिले नाही. समोरची व्यक्ती कधी त्यांना रागावून बोलली तर त्या व्यक्तीला हसत बोलायच्या माणसाने आपले आयुष्य कसे जगावे याचा जणू वस्तुपाठच त्यांनी आम्हांला दिला. जीवनाचे केवढे मोठे तत्त्व त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवत असे. आज या सर्व गोष्टीला आम्ही पारखे होतोय. आतादेखील त्यांच्या आठवणी, त्यांच्याबरोबरचे प्रसंग आठवताना अश्रू थांबत नाहीत.
‘‘पावणं बायडीला खाली पाठवा, माझा स्पंदन कसा आहे? आई-तात्या चांगली हायतं का?’’ ही वाक्ये कानात अजूनही घुमत आहेत.
त्यांचे कर्तृत्व काय आहे असे मला विचारले तर मी म्हणेन, ‘‘आपल्या आईवडीलांची सेवा मनापासून, न कुरकुरता, न थकता, न कंटाळता, स्वतःचे आजारपण विसरुन केली हेच त्यांच्या जीवनातील मोठे कर्तृत्व आहे आपल्या आयुष्यात त्यांनी कुणाला दुखावले नाही हे त्यांचे कर्तृत्व आहे. सर्व आले गेलेल्या माणंसाना आपुलकी लावणं हेच त्यांचे मोठे कर्तृत्व आहे.’’
आईवडीलांची केलेली सेवा, आपल्या मुला बाळांना लावलेला लळा, भावावरील माया, प्रत्येक पाहुण्याला घरी आल्यानंतर दिलेला चहापाणी या आठवणी त्यांना जावून दोन वर्षे पूर्ण झाले तरी अजूनही मनामध्ये त्यांच्या आठवणी कालवाकालव करत आहेत. प्रेमाची सावली असलेल्या सौ.कमल दिनकर पाटील यांना व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन....!

शब्दांकन : डाॅ.संदीप डाकवे
मो.97640 61633

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

डाॅ.संदीप डाकवे यांची हटके कलाकृती शब्दचित्र रेखाटून पालकमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...!

डाॅ.संदीप डाकवे यांची हटके कलाकृती शब्दचित्र रेखाटून पालकमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...!
तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांचे शब्दचित्र रेखाटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी दिल्या आहेत. ना.शंभूराज देसाई यांचा वाढदिवस आणि डाॅ.संदीप डाकवे यांची हटके कलाकृतीची भेट असे समीकरण गेले काही वर्षे झाले आहे. यापूर्वी त्यांनी ठिपके, रांगोळी, अक्षरगणेशा, पोस्टर पोट्रेट, 72 वह्यामधून ना.देसाई यांची साकारलेली चित्रे देवून शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या 54 चित्रांची नोंद ‘‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’’ या पुस्तकाने घेतली आहे.  डाॅ.संदीप डाकवे यांच्या वैविध्यपूर्ण प्रदर्शन, हस्तलिखीत यांचे उद्घाटन ना.देसाई यांच्या हस्ते झाले आहे. यापूर्वी ना.शंभूराज देसाई आणि डाॅ.संदीप डाकवे यांच्या सोबतच्या सुमारे 500 हून अधिक छायाचित्राचे ‘‘स्नेहबंध’’ नावाने फोटो बायोग्राफीक बुक प्रकाशित झाले आहे. डाॅ.डाकवे यांच्या अनेक कार्यक्रमांना ना.शंभूराज देसाई यांची उपस्थिती हे एक वैशिष्ट्य आहे. गत काही वर्षापासून ना.देसाई यांना आपल्या कलेतून शुभेच्छा देत असलेल्या डाॅ.डाकवे यांच्या यावर्षाच्या कलात्मक शुभेच्छा कशा असणार? याची उत्सुकता सर्वांना होती.
शब्दचित्र रेखाटण्यात माहीर असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी उत्कृष्ट संसदपट्टू, माजी गृहराज्यमंत्री, साहेब, पालकमंत्री, नामदारसाहेब, मंत्री महोदय, शंभूराज देसाई अशा विविध शब्दात ना.शंभूराज देसाई यांचे अनोखे चित्र रेखाटले आहे या चित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

*पाटण तालुक्यात सिने कलाकारांची मांदियाळी..!*तब्बल ११० मराठी कलाकारांची उपस्थित राहणार...!मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिनी जोरदार 'शंभुदौलत जल्लोष' तयारी

*पाटण तालुक्यात सिने कलाकारांची  मांदियाळी..!*
तब्बल ११० मराठी कलाकारांची उपस्थित राहणार...!

मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिनी जोरदार 'शंभुदौलत जल्लोष' तयारी
पाटण - महाराष्ट्राचे उत्पादन शुल्कमंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १७ रोजी सिने क्षेत्रातील तसेच विविध टीव्ही मालिकेतील तब्बल ११० सुप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे 'शंभुदौलत जल्लोष' हा भव्य संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.त्यामुळे आजपर्यंत सिनेमाच्या आणि टीव्हीच्या पडद्यावर दिसणाऱ्या  कलाकारांची मांदियाळी पाटण तालुक्यात पहावयास मिळणार आहे.

 शंभूराज देसाई यांचा वाढदिवस म्हटले की तमाम जनतेच्या आणि मतदारांच्या मनोरंजनासाठी देसाई नेहमीच आपल्या मतदारसंघात मतदार आणि जनता यांच्यात आनंदाचा जल्लोष निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात.मग सत्ता असो अथवा नसो किंवा विरोधकांनी कितीही टीका टिपण्या केल्या तरी शंभूराज देसाई यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यासाठी आपल्या नेत्याचे  मन तृप्त करणारे भाषण  ऐकून त्यासोबत तृप्त भोजन  आणि रात्री दिलखुलास मनोरंजन हे जणू समीकरणच ठरलेले असते यामुळे केवळ युवा मतदारच नव्हे तर सर्वसामान्य सर्वच घटकतील मतदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये राजकारणा पलीकडील एक आपुलकीचे आणि जिवापाड प्रेमाचे घट्ट  नाते तयार झालेले आहे.
   सध्या तर शंभूराज देसाई हे महाराष्ट्राचे उत्पादन शुल्कमंत्री आणि त्यातच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने पाटण मतदारसंघात मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मंत्री देसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध राजकीय,सामाजीक तसेच मनोरांनात्मक कार्यक्रमांची अक्षरशः रेलचेल झाली आहे.या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, पांढरे पट्टे मारलेले  चकाचक रस्ते,विविध फलक शेजारी आकर्षक लोकनेत्यांचे शताब्दी स्मारक,रंगीबेरंगी पाण्याचे कारंजे, हेलिपॅड,क्रिकेटची भव्य स्पर्धा,आरोग्य शिबीरासाठी भव्य दालने,विविध आकर्षक स्टॉल आणि बरेच काही यामुळे दौलतनगर परिसराला अक्षरशः पर्यटन क्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  
    दरम्यान यामध्ये भर म्हणून सिनेमाच्या आणि टीव्ही च्या पडद्यावरील शेकडो मराठी कलाकार यांची मांदियाळी हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्टय आहे.आपल्या विविध कला सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हे सर्व कलाकार दौलतनगर येथे गुरुवारी येत आहेत यामध्ये प्राजक्ता माळी,अभिनव बेर्डे,मयुरेश पेम,सिद्धार्थ चांदेकर,पूजा सावंत,नेहा पेंडसे,भार्गवी चिरमुले,गौरव मोरे,हिना पांचाळ,ऐश्वर्या बदाडे,विद्या सदाफुलें,कविता राम,आकांक्षा कदम,राहुल सक्सेना,वनिता खरात,मीरा जोशी अशा ११० कलाकारांचा समावेश आहे.
त्यामुळे आजपर्यंत सिनेमाच्या आणि टीव्हीच्या पडद्यावर दिसणाऱ्या  कलाकारांची मांदियाळी पाटण तालुक्यात प्रत्यक्ष पहावयास मिळणार आहे.

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

"द ग्रेट इंडियन" बुक ऑफ रेकाॅर्डस मध्ये डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावांची नोंद

"द ग्रेट इंडियन" बुक ऑफ रेकाॅर्डस मध्ये डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावांची नोंद

तळमावले/वार्ताहर
‘‘द ग्रेट इंडियन या राष्ट्रीय विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या पुस्तकात पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावाची नोंद झाली असल्याची माहिती या पुस्तकाचे संपादक डाॅ.सुनील दादा पाटील यांनी दिली आहे. या विक्रमाबद्दल सर्व स्तरांतून डाॅ.संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डाॅ.डाकवे यांनी 75 थोर क्रांतीकारकांची चित्रे रेखाटली होती. 15 ऑगस्ट, 2022 रोजी त्या चित्रांचे प्रदर्शनदेखील भरवले होते. डाॅ.डाकवे यांचा हा सातवा विक्रम आहे.
क्रांतीतीकारकांचा इतिहास, त्यांची शौर्यगाथा मांडण्याचा प्रयत्न डाॅ.संदीप डाकवे यांनी कमीत कमी रेषामध्ये स्केचेस साकारुन केला आहे. डाॅ.संदीप डाकवे केवळ चित्रे न रेखाटता कलेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम वेळोवेळी करत असतात. आपल्या कलेला त्यांनी समाजप्रबोधनाचे माध्यम बनवले आहे. यामुळेच त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 4 वेळा तर विविध संस्थांनी सुमारे 55 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे.
कलेतून आत्मिक समाधान आणि जपलेेली सामाजिक बांधिलकी अतिशय कौतुकास्पद अशीच आहे. त्यांच्या या बांधिलकीचे समाजातून नेहमी कौतुक होत आहे. डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावाची नोंद ‘‘द ग्रेट इंडियन या या राष्ट्रीय विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या पुस्तकात झाल्याने सर्वच स्तरांतून डाॅ.डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आतापर्यंतचे कलेतील रेकाॅर्ड :
1. जास्तीत जास्त मान्यवरांना त्यांची चित्रे भेट 
2. मराठी संपादकांना त्यांच्या वयाइतकी चित्रे भेट
3. 54 चित्रे भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा
4. लाॅकडाऊनमध्ये समाजप्रबोधन
5. 81 पोस्ट कार्डातून शुभेच्छा
6.  1x1 सेमी आकारात कलाकृती

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्रीमती ऋतुजा रमेश लटके विजयी

मुंबई उपनगरदि.6 :  महाराष्ट्र विधानसभेच्या ‘166 – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज रविवार, दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडली. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या या मतमोजणी प्रक्रियेत एकूण 66,530 मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या श्रीमती ऋतुजा रमेश लटके  विजयी झाल्या आहेत अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री.प्रशांत पाटील केली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल उपस्थित होते. त्यानंतर श्री. पाटील यांनी विजयी उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.

अंधेरी पूर्व’ या विधानसभा मतदारसंघाच्या सर्व 256 केंद्रांवर दिनांक 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या मतदान प्रक्रियेत एकूण 31.75 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. आज या मतदानाच्या मतमोजणीस सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. प्रारंभी टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर एकूण 19 फेऱ्यांमध्ये ई.व्ही.एम. द्वारे मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  माध्यमांना मतमोजणी प्रक्रियेची तात्काळ माहिती मिळण्याच्या दृष्टीने माध्यम कक्षही स्थापन करण्यात आला होता.

महाराष्ट्र विधानसभेच्या ‘166 – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत शेवटच्या १९ व्या फेरी अखेर अणि टपाली मतदानातून  उमेदवारांना मिळालेली एकूण मते याची आकडेवारी खालील प्रमाणे आहे:

१) श्रीमती ऋतुजा रमेश लटके (पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ६६,५३०

२) श्री. बाला व्यंकटेश नाडार (पक्ष – आपकी अपनी पार्टी ) : 1,515

३) श्री.मनोज श्रावण नायक (पक्ष – राईट टू रिकॉल पार्टी) : 900

४) श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष ) : 1,531

५) श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष ) : 1,093

६) श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष ) : 624

७) श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष ) : 1,571

(नोटा : 12,806, अवैध मते 22)

एकूण मते : 86,570

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...