सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

सातारा ; डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध

सातारा ; डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध

सातारा दि. 29 : सातारा जिल्ह्यामध्ये दि. 31 ऑगस्ट 2022 रोजीच्या सकाळी 7 वा.पासून ते दि. 10 सप्टेंबर 2022 रोजीच्या 10 वाजेपर्यंत या कालावधीसाठी डॉल्बी मालक/धारक/गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना त्याच्या कब्जातील डॉल्बी सिस्टिीम वापरात/उपयोगात आणू नये तसेच डॉल्बी मशिन व त्यासंबंधीची यंत्रसामुग्री स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी यासाठी जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध आदेश जारी केले.

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

मोठी बातमी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन

मोठी बातमी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे  यांचं अपघाती निधन 
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

अपघातानंतर एक तासभर कुणाचीही मदत नाही

मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. कदम यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला त्यावेळी त्यांनीसांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?; काँग्रेसकडून महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत

 मुंबई - विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं असा दावा काँग्रेसनं केला होता.

मात्र उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची शिफारस केली. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दानवेंच्या नियुक्ती ची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे.



याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता. परंतु २०१९ च्या निकालानंतर लोकशाहीचा तमाशा भाजपानं केला. विपरीत परिस्थितीत आम्ही महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला होता. जनतेच्या हितासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनी तो निर्णय घेतला होता. विरोधी पक्षात काम करण्याची आमची मानसिकता होती असं त्यांनी सांगितले.

तसेच महाविकास आघाडी ही कायमची आघाडी नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर काँग्रेस स्वबळावर लढायला तयार आहे. एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायची ही भूमिका काँग्रेसची नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देताना काँग्रेसला विश्वासात घेतले नाही. महाविकास आघाडी म्हणून यावर चर्चा व्हायला हवी होती. चर्चा न करता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता निवडला गेला त्याला आमचा विरोध आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस राहणार की बाहेर पडणार याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड
विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असून विरोधी पक्षनेतेपदी मराठवाड्यातील शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची निवड करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपसभापतींकडे केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेचे शिफारस पत्रही उपसभापती निलम गोऱ्हे यांना देण्यात आले. त्यानंतर उपसभापती कार्यालयाकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड केल्याचं जाहीर करण्यात आले. मात्र याच निवडीवरून आता महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगलं आहे. त्यात नाना पटोलेंनी मविआ कायमची नाही असं सांगत महाविकास आघाडीत फूट पडण्याचेच संकेत दिले आहेत.

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

रंगभूमी ‘जगलेले’ अभिनेते...प्रदीप पटवर्धन

रंगभूमी ‘जगलेले’ अभिनेते...प्रदीप पटवर्धन

आज सकाळीच मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाल्याची बातमी वाचली आणि क्षणात त्यांच्याबरोबर व्यतित केलेली आठवण ध्यानात आल्या. शाळेत असताना मी ‘ब्लॅक व्हाईट’ टीव्हीवर अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे चित्रपट, मालिका पाहिल्या होत्या.
मी मुंबईला चंदनवाडी-मरीन लाईन्स् येथे असताना कामानिमित्त गिरगावला येणे जाणे नेहमी व्हायचे. त्यावेळी जाताना झावबावाडी लागायची. झावबावाडी-ठाकूरव्दार येथे प्रदीप पटवर्धन राहतात अनेकांकडून समजले. सन 2014 च्या दशकात सोशल मिडीया आजच्याएवढा प्रभावी नव्हता. त्यावेळी अनेकजण व्यक्त होण्यासाठी फेसबुकवर पोस्ट टाकायचे. चंदनवाडीत ‘सी वार्ड’ च्या पुढील बाजूस कोपऱ्यावर चहावाला होता. त्याच्याकडे आम्ही सकाळी चहा घेण्यासाठी जायचो. त्यावेळी मला एक दोनदा प्रदीप पटवर्धन तिथून चालत जाताना दिसले होते. परंतू त्यांच्या जवळ जावून त्यांच्याशी बोलण्याची माझी हिम्मत झाली नव्हती. एकदा मला ते ट्रेनमध्ये दिसले होते.
10 मार्च, 2014 रोजी प्रदीप पटवर्धन ‘सी वार्ड’च्या कार्यालयात आले होते. त्यांच्या कामाला वेळ लागणार होता म्हणून ते ऑफीसच्या खाली झाडाजवळ खुर्ची टाकून बसले होते. मी त्या ठिकाणाहून तिकडे जात असताना मला ते दिसले. यावेळी मी त्यांच्या जवळ गेलो. माझी ओळख सांगून मी त्यांना आपले चित्रपट पाहत असतो, आवडतात याची माहिती दिली. त्यांना तेथून जवळच असलेल्या आमच्या शिवसमर्थ संस्थेच्या कार्यालयास भेट देण्यासाठी विनंती केली. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘चला जावूया’ असे म्हणत माझ्यासोबत आले. ऑफीस मध्ये आल्यानंतर त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांचा संस्थेची दिनदर्शिका, दिवाळी अंक आणि शाल देवून सन्मान करण्यात आला. त्यानंतर ते आपल्या कामासाठी निघून गेले.
अनेक चित्रपट, मालिका, नाटके यामधून आपली लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचे पाय अखेरपर्यंत जमिनीवर होते. त्यांच्या मध्ये असणारा कमालीचा नम्रपणा मला विशेष जाणवून गेला. हल्ली एक दोन मालिका, चित्रपट किंवा जाहिरात केलेल्या कलावंताच्या वागण्यातील आवेश पाहिला तर प्रदीप पटवर्धन यांच्या सारख्या अभिनेत्यांची लोकांशी समरस होण्याची भावना आठवल्या वाचून राहत नाही. आपल्या सार्वजनिक जीवनातील वागण्या बोलण्यातून समाजमनावर असे दिग्गज अभिनेते आपली छाप पाडतात. प्रदीप पटवर्धन हे असेच व्यक्तिमत्त्व होते. शेवटपर्यंत खऱ्या अर्थाने रंगभूमी जगलेल्या ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो ही प्रार्थना....!

-डॉ. संदीप डाकवे
स्पंदन परिवार

बिहार : नितीशकुमार - भाजपा सरकार कोसळले

बिहार : नितीशकुमार - भाजपा सरकार कोसळले

बिहार दि.9 महाराष्ट्रात बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार होत असताना बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेतली आहे. भाजपच्या सर्व 16 सदस्यांनी मंत्रिमडळातून राजीनामे दिल्यामुळे राज्य सरकार कोसळले असून मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार आहेत. दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी (आरजेडी) जेडीयूची युती होण्याची शक्यता वर्तवली जातेय. नितीश कुमार यांनी मंगळवारी जेडीयूच्या आमदार व खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीत कुठल्याही लोकप्रतिनिधीला मोबाईल घेऊन येण्यास मज्जाव करण्यात आला होता. काँग्रेस-डावी आघाडी आणि आरजेडी यांच्यासह जेडीयू पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नवी दिल्ली ; लोकसभेतील गटनेतेपदाच्या लढाईत शिंदे गटाचे प्रतिज्ञापत्र तर ठाकरे गटाने मागितली वेळ

नवी दिल्ली ; लोकसभेतील गटनेतेपदाच्या लढाईत शिंदे गटाचे प्रतिज्ञापत्र तर ठाकरे गटाने मागितली वेळ

नवी दिल्ली दि.9  : लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदावरून सुरू झालेल्या वादाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत.गेल्या १९ जुलैला लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड केली होती. या निवडीवर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला होता. या निवडीमध्ये नैसर्गिक न्यायाची पायमल्ली झालेली आहे, असा आक्षेप नोंदविला होता.

यावरून लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या १२ खासदारांनी आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. यानुसार शिंदे गटाच्या बाराही खासदारांनी वकीलांमार्फत हे निवेदन दिले आहेत. यात १८ पैकी १२ खासदारांनी एकमताने गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड केल्याचा दावा केला आहे. शिवसेना खरी कोणती यावरून निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी दिली.

ठाकरे गटाने मागितली वेळ

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची काही वेळ मागून घेतला आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राज्याला अखेर कारभारी मिळाले 18 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्याला अखेर कारभारी मिळाले 18 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई . जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.

या शपथविधी सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्राचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे राष्ट्रीय महसचिव विनोद तावडे उपस्थित होते.

शिंदे गटातील मंत्री

गुलाबराव पाटील (कॅबिनेट)
दादा भुसे (कॅबिनेट)
संजय राठोड (कॅबिनेट)
संदीपान भुमरे (कॅबिनेट)
उदय सामंत (कॅबिनेट)
तानाजी सावंत (कॅबिनेट)
अब्दुल सत्तार (कॅबिनेट)
दीपक केसरकर (कॅबिनेट)
शंभूराज देसाई (कॅबिनेट)

भाजपतील मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)
सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट)
चंद्रकांत पाटील (कॅबिनेट)
विजयकुमार गावित (कॅबिनेट)
गिरीश महाजन (कॅबिनेट)
सुरेश खाडे (कॅबिनेट)
रवींद्र चव्हाण (कॅबिनेट)
अतुल सावे (कॅबिनेट)
मंगलप्रभात लोढा (कॅबिनेट)

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

कराड जनता सहकारी बँकेच्या संचालक,शासकीय अधिकाऱ्यांसह 27 जणांवर गुन्हा दाखल

  

कराड जनता सहकारी बँक प्रकरण : संचालक, शासकीय अधिकाऱ्यांसह 27 जणांवर गुन्हा दाखल

कराड दि.8 कराड जनता सहकारी बँक  बोगस कर्ज प्रकरणात चांगलीच गुरफटत चालली आहे. या बँकेच्या संचालकांसह शासकीय अधिकाऱ्यांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एकूण 27 जणांचा समावेश आहे.कोट्यवधी रुपयांची बोगस कर्ज दिल्याबाबत सध्या या बँकेची ईडीकडून चौकशी सुरु आहे. यात ज्या ज्या लोकांना मोठ्या रकमांचे कर्ज देण्यात आले आहे त्या त्या कर्जदारांची ईडी चौकशी करत आहे. हे सुरु असताना बँकेतीलच कर्मचाऱ्यांच्या नावे घेतलेल्या कर्ज प्रकरणाबाबत न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर, रात्री कराड पोलिसांनी बोगस कर्ज प्रकरणी 27 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात बँकेचे कर्मचारी राजेंद्र देसाई यांनी तक्रार दिली आहे.  

यांच्यावर झाले गुन्हे दाखल

कराड जनता बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी, संचालक विकास धुमाळ, राजीव शहा, सुरेश लाहोटी, दिलीप चव्हाण, आकाराम शिंगण, दिनकर पाटील, शंकरराव काटे, प्रकाश तवटे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, रमेश गायकवाड, डॉ परेश पाटील, संजय घोक्षे, राजेंद्र पाटोळे, प्रतिभा पाटील, ज्योती शहा, अनिल यादव, संजय जाधव, विजयकुमार डुबल, दीपक पाटणकर, बाजीराव पाटील, अरुण पाटील आणि भाऊसाहेब थोरात, अशा 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

ढेबेवाडी - नागठाणे येथील अपघातात ढेबेवाडीतील जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

नागठाणे येथील अपघातात ढेबेवाडीतील जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

सातारा दि.3 साताऱ्यात नागठाणे येथील  राष्ट्रीय महामार्गावर पहाटे 6 च्या सुमारास भीषण अपघात झालायं.वॅगनार गाडीने थांबलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जातयं. या अपघातात नाना साळुंखे आणि लक्ष्मी साळुंखे या जोडप्याचा मृत्यू  झाला असून मुलगी माधुरी साळुंखेसह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मच्छिंद्र जाधव वय 40, तनुजा जाधव वय 35 आणि कनिष्क जाधव वय 4 हे या अपघातात गंभीर जखमी झालेयं.
अपघातात ढेबेवाडी येथील नाना साळुंखे आणि लक्ष्मी साळुंखे या जोडप्याचा मृत्यू

साळुंखे कुटुंबीय मुंबईहून आपल्या ढेबेवाडी या गावी जात असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. नागठाणे चौकात आणि रस्त्याच्या कडेला वाहने लावली जातात त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. या ठिकाणी नेहमी वर्दळ असल्या कारणाने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे .पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 



*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...