ढेबेवाडी : बिबट्याने मारली उडी आणि शेतकऱ्याचा जीवाचा थरकाप
कुमजाई पर्व न्यूज / मनोज सावंत
ढेबेवाडी ता.पाटण: डोळ्यादेखत झुडपातून उडी मारून शेळीला पळवून नेण्याचा बिबट्याचा प्रयत्न तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी हाणून पाडला. मात्र, झटापटीत शेळीचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मराठवाडी (ता. पाटण) जवळच्या शिवारात काल दुपारी साडेबाराच्या सुमारास हा थरार प्रकार घडला. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे त्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडी येथील विलास चंद्रू शिंदे यांनी बुधवार दि.18 सकाळी नेहमीप्रमाणे जनावरे गावाजवळच्याच माळवर चरण्यास सोडलेली होती.तेथेच गवतात खुंटी ठोकून दोरीने शेळीला बांधले होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास जवळच्याच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बेसावध शेळीवर झडप टाकून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जवळच असलेल्या अजय शिंदे, आबासाहेब सुतार, आनंद शिंदे, श्री. कदम आदींनी तिकडे धाव घेऊन बिबट्याला आरोडाओरड करून जोरदार प्रतिकार करत त्याच्या तावडीतून शेळीला सोडविण्याचा प्रयत्न केला.
काही वेळानंतर शेळीला तेथेच सोडून बिबट्याने डोंगराकडे धूम ठोकली. मात्र, तत्पूर्वीच बिबट्याशी झालेल्या झटापटीमुळे शेळीचा मृत्यू झाला होता. वनपाल सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याचे हल्ले वाढल्याने शिवारात शेतीच्या कामानिमित्त आणि जनावरांना चरण्यास घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण आहे.तरी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा