सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर :राष्ट्रवादीचे बारा तर शिवसेना व काँग्रेसचे चार सदस्य समितीवर
सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची बहुप्रतिक्षीत यादी सोमवारी मंत्रालयातून जाहीर करण्यात आली. या निवडीचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले,
सातारा : सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची बहुप्रतिक्षीत यादी सोमवारी मंत्रालयातून जाहीर करण्यात आली. या निवडीचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, राष्ट्रवादीच्या बारा तर कॉंग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी चार सदस्यांना समितीवर संधी देण्यात आली आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून नियोजन समिती सदस्यांची यादी केव्हा जाहीर होणार याची राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती.मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर उपसचिवांनी याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी बी. जे. जगदाळे यांना सोमवारी दुपारी प्राप्त झाले. या समितीतील 20 सदस्यांमध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांतून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांचा समावेश झाला आहे.
विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची निवडीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा अपेक्षेप्रमाणे प्रभाव दिसून आला. तब्बल सत्तेचाळीस दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने झालेली अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याच्या वृत्ताला नियोजन समितीच्या सूत्रांनी दुजोरा दिला. त्यानुसार आज सातारा जिल्ह्यातील नियोजन समितीची विशेष निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर झाली. अपेक्षेप्रमाणे महा विकास आघाडीचे संतुलित प्रतिबिंब जिल्हा पातळीवर कसे उमटेल याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यानुसार ज्या पक्षाचा पालकमंत्री आहे. त्यांना जादा जागा दिल्या जातात. यामध्ये नामनिर्देशित सदस्यांमध्ये आमदार व खासदारांपैकी दोन सदस्य घेतले जातात.
नामनिर्देशित तज्ञ सदस्य म्हणून चार व विशेष निमंत्रित १४ सदस्यांचा समावेश केला जातो. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला १२, शिवसेनेला चार व काँग्रेसला चार सदस्य वाटणीला आले आहेत. यामध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांतून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार मकरंद पाटील व दीपक चव्हाण यांच्या नावाचा समावेश केला आहे.
तसेच जिल्हा नियोजन समितीचे ज्ञान असलेले तज्ञ नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. विजयराव कणसे, शिवसेनेतून जयवंत शेलार यांचा समावेश केला आहे. विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये राष्ट्रवादीतून धैर्यशील अनपट, ॲड. श्यामराव गाढवे, सतीश चव्हाण, दीपक पवार, सुरेश्चंद्र उर्फ राजभाऊ काळे, सागर साळुंखे, प्रभाकर देशमुख, संतोष पाटील. काँग्रेसमधून अशोक गोडसे, जयवंतराव जगताप, हिंदूराव पाटील, शिवसेनेतून शेखर गोरे, राजेश कुंभारदरे, राहूल बर्गे यांच्या नावाचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा