" शिवसमर्थ " कोरोना सेंटर रुग्णांसाठी आधारवड : मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा
तळमावले / वार्ताहर:
पानमळेवाडी (ता.सातारा) येथील शिवसमर्थ कोरोना सेंटर रुग्णांसाठी आधारवड ठरले आहे. कोविड काळात अथक काम करणा-या आशा सेविकांचा आज झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढले. कोव्हीड-19 सारख्या महामारीच्या काळात आशा वर्कर म्हणून ग्राउंड लेव्हलला काम करणाऱया 70 आशाताई यांचा पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौडा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
दि शिवसमर्थ को-ऑपरेटिव्ह सोसायटी तळमावले ता. पाटण, शाखा मार्केट यार्ड सातारा यांच्यावतीने व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता संभाजी इंदलकर यांच्या सहकार्याने पानमळेवाडी येथे मोफत शिवसमर्थ कोरोना केअर सेंटर चालवले जाते. दोन महिन्यांत 110 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.
या केंद्राला वैद्यकीय सहकार्य मेडीकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व श्वास मल्टीस्टेट हॉस्पिटल साताराचे प्रवीण पाटील, रयत शिक्षण संस्था इंजिनीअरिंग कॉलेज लिंबखिंडचे प्राचार्य शेख, स्वयम् सामाजिक संस्थेचे विभुते, प्रेरणा फाऊंडेशनचे चंदन जाधव, टॉप गिअर प्रा. लि. चे शशिकांत पवार, शिवसमर्थ अन्नछत्र समितीचे व लिंब कोंडवे भागातील सर्व सरपंच यांचे लोकसहभागातून सहकार्य लाभले आहे. या सेंटरची सुविधा, येथील कामकाज, जेवण - नाश्त्याचे नियोजन सुंदर आहे. सभापती सरिताताई यांचे काम कौतुकास्पद असून शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीचे काम समाजाला प्रेरणा देणारे आहे. यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे कौतुकोद्गार विनय गौडा यांनी काढले.
शिव समर्थ हॉस्पिटलसाठी हनुमंत पवार व शैलेश वैश्य मेडिकल हेल्थ प्लस प्रभादेवी मुंबई यांच्या वतीने सातारा तालुक्यातील शिव समर्थ कोरोना सेंटरसाठी एक लाख रुपयांची औषधे देण्यात आली. याप्रसंगी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी आशा सेविका व दानशूर व्यक्तींचे काम गौरवास्पद आहे, असे सांगितले. शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी भविष्यात लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल निर्माण करण्याची तयारी दर्शविली. शिवसमर्थ सेंटरसाठी योगदान देणारे हेमंत तुपे, प्रवीण पाटील, शशिकांत पवार, चंदन जाधव, प्रेरणा फाउंडेशनचे कार्यकर्ते, डॉ. अलिफ इनामदार, डॉ. अंबाजी राजमाने, डॉ. मेहता, डॉ. रेणू, सरपंच विनोद शिंदे यांचा सत्कार विनय गौडा व पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पंचायत समितीच्या माजी सदस्य कविता मानकर, सैदापूरच्या सरपंच शितल पवार, सरपंच रूपाली कांबळे, सारखळ सरपंच बडदरे, राहुल काळे, अमोल गोगावले, नवनाथ ननावरे, हनुमंत जगताप, धर्मेंद्र सावंत, अविनाश सावंत, विशाल ननवरे, मंगेश पाटील, जहिर फरास, अमोल मेणकर आदी उपस्थित होते.
दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष जनार्दन बोत्रे व उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांच्या मार्गदर्शनातून अनेक सामाजिक उपक्र राबविले जातात. मुख्यमंत्री सहाय्यता फंडात 1 लाख, पत्रकार, कोविड योद्धा, पोलिस पाटील, सर्व आरोग्य सेवा देणारे यांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप, कोल्हापूर विभागात दररोज 100 हुन अधिक लोकांची जेवणाची सोय, ढेबेवाडी हॉस्पिटलमध्ये वॉटर आरओ, 24 तास रुग्णवाहिका, मास्क, सॅनिटाझर, वस्तूचे वाटप असे योगदान देणा-या शिवसमर्थ मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचा विनय गौडा यांनी आपल्या भाषणात गौरवपुर्ण उल्लेख केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा