कृष्णत रामचंद्र पाटील व त्यांची पत्नी संगीता हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुढे येथील सेवानिवृत्त सैनिक कृष्णत पाटील यांचे माडीचे दुमजली घर आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक सिलिंडरच्या टाकीला असलेल्या पाईपला गळती लागून घरभर गॅस पसरला.सकाळच्या वेळी घराचे दरवाजे, खिडक्या बंद होत्या. त्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला. यावेळी घरात कृष्णत पाटील यांच्यासह त्यांची पत्नी संगीता तसेच त्यांची दोन मुले, सुन आणि नातू असे सर्वजण घरातच होते. अचानक झालेल्या या स्फोटामुळे सर्वजण घाबरले. स्वयंपाकगृहात असणाऱ्ता संगीता यांनी गॅसवर चहा ठेवला होता.
स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. त्यामध्ये संगीता यांच्या अंगावरील साडीने पेट घेतला. मुलगा संदीप याने समय सुचकता दाखवित आग विझविली. मात्र, तोपर्यंत संगीता या भाजून जखमी झाल्या. तर कृष्णत यांच्या डोक्यालाही मार लागला. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्या दोघांना तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले.
घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती मिळाल्यानंतर ढेबेवाडी पोलिसांनीही तातडीने त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत कृष्णत पाटील यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा