तळमावले : संतोष नानांच्या जाण्याने मैत्री पर्वातील एक तारा निखळला -डाॅ.संदीप डाकवे
संतोष पवार...कालपासून लिहण्याचा प्रयत्न करतोय. खरंतर, ‘संतोष पवार यांचे निधन’ ही बातमी लिहताना...‘भावपूर्ण श्रध्दांजली’ बॅनर करताना हात थरथरले. सर्वजण त्यांना ‘संतोष नाना’ म्हणायचे. संतोष नाना, आपल्यात नाहीत ही गोष्ट आजही मन मानायला तयार नाही. हाफ शर्ट, देखणी दाढी, वेगळया खर्जातला आवाज, एखाद्यावर कितीही रागावले तरी शेवटी विनोद करत, हसून बोलण्याची सवय, रुबाबदार चालणारे व्यक्तिमत्त्व कालपासून डोळयासमोर येतोय. कुटूंबीय, नातेवाईक, मित्र परिवार यांच्यामध्ये आपल्या स्वभावाने आपले वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. एक दिलदार मित्र कसा असावा हे संतोष नाना यांच्याकडे पाहून शिकायला मिळते.
सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व संतोष नानांचे होते. लहान वयापासूनच त्याने आपल्या कुटूंबाची जबाबदारी स्वीकारली. आपले कुटूंब, नातेवाईक, मित्र यांच्यासाठी संतोष नाना नेहमी पुढे असायचे. त्यांना मिळालेल्या यशाचा इतरांना मनापासून आनंद वाटायचा. मित्र किंवा मैत्री कशी असावी याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे संतोषनाना होय.
साधारणपणे 3 वर्षापूर्वी झालेल्या मोठ्याा अपघातामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. बरेच दिवस त्यांना बेडरेस्ट घ्यावी लागली. काही दिवस वाॅकरवर चालावे लागले तरी त्यांनी पुन्हा मोठ्याा आत्मविश्वासाने यातून बाहेर पडले. नेहमी प्रसन्न असायचे. संतोष पवार यांच्या आकस्मिक जाण्यामुळे त्यांच्या कुटूंबावर, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यावर दुःखाची छाया पसरली आहे. त्यांच्या मित्रपरिवारातील चैतन्य हरपल्यासारखेच झाले आहे.
कोणत्याही संकटात दोन हात करण्यासाठी ते नेहमी पुढे असायचे. परंतू या आजारपणाच्या काळात त्यांनी दिलेली झुंज अयशस्वी ठरली आहे. माझे लग्न चांगल्या पध्दतीने व्हावे यासाठी त्यांनी ते त्यांच्या दारात आयोजित केले होते. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत अविस्मरणीय आहे. आमचे संबंध मित्रत्वातून नात्यांकडे आणि नात्यांतून मैत्रीकडे गेले आहेत. त्यांच्या अकाली जाण्यामुळे माझ्या मैत्री पर्वातील एक तारा निखळला आहे. कुटूंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांना जोडणारा दुवा आज निखळल्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. संतोष नानांची उपस्थिती ही कार्यक्रमामध्ये ‘जान’ आणणारी असायची. माझ्या एकंदरित पत्रकारिता व चित्रकलेचा क्षेत्रातील यशाबद्दल ते जाम खूश असायचे. ते म्हणायचे, ‘‘दाजी, तुमचा नादच करायचा न्हाय’’. त्यांची मोठी मुलगी रिध्दीचे फक्त ठिपक्यांच्या साहय्याने मी केलेल्या चित्राची त्यांनी फ्रेम केली होती. सर्वांना ते अभिमानाने सांगायचे हे चित्र माझ्या दाजींनी तयार केले आहे. इतरांच्या आनंदात त्यांना नेहमी आनंद वाटायचा म्हणूनच की काय त्यांचे नांव ‘संतोष’ असेल असे मला वाटते.
अॅड.जनार्दन बोत्रे साहेब यांच्या तालमीत सहकाराचे धडे गिरवल्यानंतर शिवसहयाद्री पतपेढी, दि शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीमध्ये आपल्या कामाचा त्यांनी ठसा उमटवला होता. सार्वजनिक जीवनातही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून येते. आपल्याबरोबरच इतरांची कुटूंबे उभी करण्याची त्यांनी धडपड नेहमी दिसून यायची. एक चळवळी स्वभावाचा, मोठया मनाचा माणूस आपल्यातून हरवल्याची जाणीव कायम राहील. ‘‘जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला’’ हे वाक्य ऐकणे किंवा म्हणणे सोपे असते. परंतू ते अनुभवणे मात्र महाकठीण आहे. संतोष नानांच्या अकाली ‘एक्झिट’ मुळे एक हसतमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची जाणीव होत आहे. संतोष नानांना विनम्र श्रध्दांजली...!
शब्दांकन: डाॅ.संदीप डाकवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा