तळमावले/वार्ताहर
काळगावं दि.23: कोरोनाचा वाढता समूह फैलाव रोखण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असून कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ हे समाजजागृती अभियान राज्यभर राबविले जात आहे. काळगांव पं.स.गणात या उपक्रमाचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र काळगांव येथे. पं.स पाटण सदस्य विरोधी नेते पंजाबराव देसाई (तात्या), प्रशासक तथा शिक्षण विस्तार अधिकारी प्रशांत आरबाळे, वैद्यकीय अधिकारी डाॅ.खबाले, गणातील सरपंच, सदस्य, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ.गरुड, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडला.
अलीकडे विभागात कोरोनाचा फैलाव झपाटयाने वाढत असल्याने ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ उपक्रमाची उपयुक्तता व समाज जागृती करुन कोरोनाचे भयावह उभे केलेले चित्र लोकांच्या मनातून पुसून टाकून त्याऐवजी या अभियानाव्दारे स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचे गट करुन घरोघरी जावून आरोग्य तपासणी, कोरोना काळात घ्यावयाची दक्षता याविषयी प्रास्ताविकात माहिती सांगितली.
आरोग्य कर्मचारी श्री.गरुड यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती देवून अंमलबजावणी कशी होणार व कालावधी याविषयी मार्गदर्शन केले.
श्री.आरबाळे यांनी या महामारीचा धैर्याने सामना करुन शासन, आरोग्य यंत्रणा, नियमित व्यायाम, सकस आहार व सकारात्मक विचार याबाबत अभियान काळात समाविष्ट घटकांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रबोधन करुन त्यांची मानसिकता बदलून या महामारीच्या उच्चाटनासाठी नियमांचे पालन करण्याविषयी उद्बोधित करावे असे मत व्यक्त केले. तसेच गेले 6 महिने कोरोनाविरुध्द लढणारे आरोग्य कर्मचारी, आषा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, दक्षता कमिटी सदस्य यांचे कौतुक केले.
श्री.पंजाबराव देसाई यांनी ‘माझे कुटूंब माझी जाबबादारी’ हे अभियान राज्यभर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राबवले जात असून तालुक्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. तसेच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई या कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन लोकांपर्यंत मदत पोहोचवत आहेत. शासनाच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर निर्माण करुन जनतेची सेवा करत आहेत व त्यांचेच अनुकरुण करुन आपण सर्व विभाग, नागरिक, ग्रामस्थ यांचे सहकार्यातून हे अभियान यशस्वी करुन कोरोनाला भागातून हद्दपार करुन भयविरहीत समाज उभा करुया असे आवाहन केले.
गणात एकूण सात पथके तयार केली असून त्यांत आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते इ.चा समावेश असून त्यांना सदर अभियानासाठी प्रशिक्षित केले असून एक पथक दररोज पन्नास कुटूंबांची माहिती संकलित करुन ज्येष्ठ नागरिक व व्याधीग्रस्त यांची विशेष काळजी व उपचार यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असून कोरोना उच्चाटनाचा प्रभावी उपाय ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
उपस्थित सर्वांचे आभार ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम (आबा) यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा