कऱ्हाड प्रतिनिधी :
कऱ्हाड तालुक्यातील रेठेरे येथे अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह कऱ्हाड तालुका पोलिसांच्या निर्भया पथकाने आज (रविवार) रोखला. पोलिसांनी विवाहापुर्वी अचानक जाऊन बालविवाह रोखुन संबधित मुलीच्या कुटूंबियांचे जबाब नोंदवून घेत त्यांना समजही दिली.
पोलिसांची माहिती अशी : कऱ्हाड तालुक्यातील रेठरे येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील मुलाशी ठरला होता. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपज्योती पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपअधिक्षक सूरज गुरव यांना त्याची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी हवालदार अतुल देशमुख यांच्यासमवेत मुलीच्या वयाची खात्रीलायक माहिती घेतली.
मुलीचे वय 16 वर्षे असल्याची कागदोपत्री खात्री होताच त्यांनी मुलीच्या कुटूंबियाकडे चौकशी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. मुलीचे वय पुर्ण होत नाही तोपर्यंत विवाह करणार नाही असे जबाब नोंदवून घेत त्यांना चांगलीच समज दिली. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधिक्षक सूरज गुरव यांनी कारवाईबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील, हवालदार देशमुख यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा