सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

काळगाव ता.पाटण ;- विजेचे खांब कोसळले; आठ जण बचावले

ढेबेवाडी (ता.पाटण)
: सडलेला लोखंडी ताण अचानक तुटल्याने प्रवाहित वाहिन्यांसह विजेचे दोन खांब कोसळल्याची घटना नुकतीच धनगरवाडा (काळगाव, ता. पाटण) येथे घडली. यावेळी प्रसंगावधान राखून बालकासह आठ जण आणि काही जनावरे सुदैवाने बाजूला पळाल्याने बचावली. वीज वाहिन्या तुटून खाली पडल्यानंतर तेथे गवत व झुडपांनी पेट घेतला होता. मात्र, वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ त्यावर नियंत्रण मिळविल्याने आग वनहद्दीत घुसता-घुसता वाचली. मोठे नुकसानही टळले.याबाबतची माहिती अशी, काळगावपासून सुमारे सात किलोमीटरवर डोंगरात वसलेल्या धनगरवाड्यापासून जवळच असलेल्या शिवारात पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळून गेलेले विजेचे दोन खांब अचानक कोसळले.
खांबांना दिलेला लोखंडी ताण जमिनीजवळ सडलेला होता. जवळच चरायला सोडलेल्या म्हशीने त्याला अंग घासल्याने तो तुटला आणि दोन्ही खांब कोसळले, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी तेथे जनावरे चरण्यासाठी घेवून आलेल्या दोन महिला, त्यांच्यासोबत असलेले एक बालक आणि पाइपलाइनसाठी खोदाई करणारे तीन कामगार तेथे होते. वनरक्षक विशाल डुबल व वसंत मोरे त्यावेळी तेथूनच वनक्षेत्रात निघाले होते. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वजण घाबरून गेले होते. या घटनेची माहिती तातडीने वीज कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने तेथे येवून वीजपुरवठा बंद केला. वनकर्मचारी मुबारक मुल्ला हेही लगेच घटनास्थळी आले. विजेच्या प्रवाहित वाहिन्या वाळलेल्या गवतात आणि झुडपात पडल्याने स्पार्किंग होवून ठिणग्या पडून गवताने पेट घेतला होता. तेथून काही अंतरावरच वनहद्द असल्याने वनकर्मचाऱ्यांनी हिरव्या फांद्यांच्या साह्याने आग विझवली व जंगल तसेच अन्य मालकी क्षेत्र आगीपासून वाचवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...