शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

धामणीत बिबट्या हाय. मुक्कामी

ढेबेवाडी - धामणी (ता. पाटण) येथे भरवस्तीत बिबट्याचा संचार वाढला आहे. योगेश सावंत यांच्या घरासमोर बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले.

विशेष म्हणजे बिबट्यासोबत एक बछडा असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. बिबट्या लोकवस्तीत आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. तेंव्हा एक बिबट्या त्या परिसरात वावरत होता. तो ये-जा करणाऱ्या वाहन चालक व दुचाकीस्वारांना दिसत होता. त्यामुळे वाहनधारक रात्रीच्या सुमारास त्या मार्गावरून जीव मुठीत धरुन प्रवास करत होते. तेंव्हापासून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर वाढला आहे. योगेश सावंत यांच्या घरासमोरच भरवस्तीत रात्री साडे आठच्या सुमारास त्याचे बछड्यासह दर्शन झाले. दुसऱ्या दिवशी प्रकाश महाजन यांच्या भरवस्तीतील घरासमोर पुन्हा त्याचे दर्शन झाले. बिबट्याचे लोकवस्तीत वारंवार दर्शन होऊ लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

येथील अजय सावंत हे आपल्या दुचाकीवरून घराकडे परतत असताना रस्त्यात त्यांच्या गाडीसमोरच बिबट्या उभा राहिला. ते थांबले तेंव्हा बिबट्याने गुरगुरत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर तो निघून गेला. यामुळे विभागात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची कल्पना ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये या परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यात आता गवा रेड्यांचा कळप शेतात घुसून उभ्या पिकांची नासाडी करू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडूनही पंचनामे करण्यापलीकडे उपाययोजना झाल्या नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.वन विभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि संबधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी सभापती संगीता पुजारी यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...