मालदन, ता. पाटण येथे वांग नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याचे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंधार्याच्या बांधकामाची पडझड झाली आहे. त्यामुळे बंधारा धोकादायक बनला आहे. या बंधार्याची कृष्णा खोरे महामंडळाने तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा भविष्यात बंधारा वाहून जाऊन मालदनसह अनेक गावांना उन्हाळ्यात गंभीर पाणी टंचाई
मालदन येथील वांग नदीवर कृष्णा खोरे विकास महामंडळाने काही वर्षापूर्वी कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधला आहे. या बंधार्यामुळे मालदन, गुढे, मान्याचीवाडी परिसरातील अनेक छोट्या मोठ्या गावातील शेकडो एकर शेती बारमाही पाण्याखाली आलेली आहे.
शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने शेती फायदेशीर झाली आहे . अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील या बंधार्यामुळे सुटला आहे. परंतु यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व महापुराने या बंधार्याला दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. यामधून सातत्याने पाण्याचा निचरा होवू लागला आहे. पाण्याच्या प्रवाहाने बांधकामास पडलेले भगदाड दिवसेंदिवस मोठे होत असून गळीतीचे प्रमाण वाढत आहे. शिवाय बंधार्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या संरक्षण भिंतीचे देखील महापुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भिंतीचे बांधकाम पडले आहे.
वांग- मराठवाडी आणि महिंद धरणातून सोडलेले पाणी गळतीमुळे जास्त काळ टिकत नसल्याने काही दिवसातच नदीचे पात्र कोरडे पडत आहे. फेब्रुवारीत पाण्याची ही अवस्था असेल तर पुढील तीन महिने पाणी पुरणार कसे, असा प्रश्न शेतकर्यांसमोर आवासून उभा आहे.
पाण्याच्या प्रवाहामुळे बंधार्याचे पिलर खिळखिळे झाले आहेत. बंधार्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी बंधरा वाहून जाऊ शकतो अशी भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय बंधार्यातून लागलेली गळती न थांबवल्यास येणार्या उन्हाळ्यात पाणी साठवणीवर सुध्दा मोठा परिणाम होऊ शकतो. कृष्णा खोरे महामंडळाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने बंधार्याच्या बांधकामाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात बंधार्याचा फक्त सांगाडा उरेल अशी भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे या परिसरातील गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी करत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा