शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

ढेबेवाडी भोसगव ; वन्यप्राण्यांचा धुमाकूळ -अडीचशे एकरांत नुकसान : रानडुक्कर, गव्यांचा उपद्रव वाढला

सणबूर : रानडुक्कर आणि गव्यांच्या कळपांनी ढेबेवाडी विभागातील भोसगाव येथील शेतशिवार परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महिनाभरातच सुमारे अडीचशे एकरांतील रब्बी ज्वारीचे पीक त्यांनी फस्त केल्याचे वनविभागाकडे आलेल्या तक्रारीतून स्पष्ट होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची स्थिती आभाळ कोसळल्यासारखी झाली आहे.
जवळपास खाद्य उपलब्ध होत नसल्याने वन्यप्राण्यांनी आजूबाजूच्या सपाटीच्या गावांकडे मोर्चा वळविला आहे. तेथील शेती वाचवतानाही शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. काळगाव परिसरात सध्या गव्यांचा तर ढेबेवाडी खोऱ्यात रानडुकरांचा उपद्र्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रब्बी ज्वारीचे पीक काढणीला आले असतानाच शिवारेच्या शिवारे रातोरात फस्त होऊ लागल्याने तोंडचा घास हिरावल्यासारखी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्र्रवाने हैराण झालेल्या ढेबेवाडीतील डोंगर भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला रामराम ठोकल्याने पडीक क्षेत्र वर्षागणिक वाढत चालले आहे.

वन्यप्राण्यांच्या उपद्र्रवाने हा हंगामही वाया गेल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. दिवसभर राखणी करून आणि रात्रभरही जागता पहारा देऊन गवे व डुक्कर जुमानत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही शेतक-यांची शिवारे लांब आणि अडवळणीच्या ठिकाणी असल्याने रात्री तेथे राखणीला थांबणे शक्य होत नाही.

सकाळी पाहावे लागते उद्ध्वस्त पीक
शेतातील काम आटोपल्यानंतर शेतकरी घराकडे जातात. त्यावेळी पीक चांगले असते. मात्र दुसऱ्या दिवशी शेतात येताच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त पीक पाहून धक्का बसतो. वन्यप्राणी रात्रीत पिकाची पूर्णत: नासाडी करतात.

खरिपातील ज्वारीचे पीक पावसामुळे हातातून गेल्याने सर्व आशा रब्बी ज्वारीवरच होत्या; पण काढणीला आठवडा उरला असतानाच एकरातील ज्वारीचे पीक रानडुकरांनी रातोरात फस्त केले.
- किरण देशमुख, नुकसानग्रस्त शेतकरी, भोसगाव

वनविभागाच्या कार्यालयाकडे पीक नुकसानीच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले जात आहेत.
- एस. एस. राऊत, वनपाल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...