दारूबंदीसाठी आज मतदान
ग्रामपंचायत ताईगडेवाडी (तळमावले) येथील शासनमान्य दारू दुकाने आणि बिअर बार बंद करावेत, या मागणीसाठी तेथील महिलांनी काही महिन्यांपासून आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. तेथील कविता कचरे यांनी याप्रश्नी महिलांना एकत्र करून मोर्चा काढून लढ्याचे रणशिंग फुंकले होते. मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी त्या वेळी केलेल्या यासंदर्भातील मागणीनुसार दारूबंदीच्या निवेदनावरील महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली. अशा प्रक्रियेत 25 टक्क्याच्यावर स्वाक्षऱ्यांची पडताळणी आवश्यक असते
पहिल्या पडताळणीवेळी 15.98 तर दुसऱ्या वेळी 23 टक्के महिलांची उपस्थिती असल्याने तिसऱ्यांदा आलेल्या महिलांच्या अर्जानुसार पुन्हा स्वाक्षऱ्यांची पडताळणी झाली. अर्जावर स्वाक्षरी केलेल्या 286 पैकी 178 महिलांनी त्यास हजेरी लावली होती त्यानुसार आज पुन्हा ग्रामसभा होवून मतदान होणार आहे .ह्या वेळी सर्व महिलांनी एकजूट करून बाटली आडवी करण्याचा निर्धार केला आहे.
आज महाराष्ट्रात दरवर्षी ६६००० अपघातात १५००० लोक मरतात. यापैकी निम्मे अपघात दारू प्यायल्याने होतात. तसेच व्यसनाधीनतेने आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ७६७२ व्यसनींनी आत्महत्या केल्या. हे सर्व बघता दारूबंदी ही महाराष्ट्रात केवळ नैतिक किंवा भाबडेपणाची मागणी नाही तर अपघात, गुन्हे, आत्महत्या, महिला अत्याचार व दारिद्रय़ यांतून सुटका करण्यासाठी गरजेची आहे
अवैध दारू रोखण्यासाठी गावोगावी ग्रामसंरक्षक दल उभारण्याची मागणी होत आहे. याचे कारण आज परवानाधारक दुकानांतून खेडय़ापाडय़ांत अवैध दारू विविध वाहनांतून पाठवली जाते आणि हॉटेल, दुकाने वा घरांतून विकली जाते. या दारूचा खेडय़ातील ग्राहक हा गरीब मजूर वर्ग असतो. दारूमुळे कार्यक्षमता कमी झालेले मजूर कामालाही जात नाही उलट कष्ट करणाऱ्या पत्नीची मजुरी हिसकावून घेतात. मारहाण करतात. पैसे दिले नाही तर घरातील वस्तू विकून दारू पितात.
एकीकडे १४व्या वित्त आयोगाने इतका प्रचंड निधी खेडय़ात जाताना, बचत गट, अन्नसुरक्षा देताना कुटुंबात होणारी बचत ही दारू काढून घेत पुन्हा अनेक कुटुंबांना दारिद्रय़ात ढकलते आहे हे कटू वास्तव आज खेडय़ापाडय़ात दिसते. त्यामुळे आज गावागावांतील अवैध दारू कशी रोखायची हा महत्त्वाचा ग्रामीण प्रश्न झाला आहे. किमान ती रोखली गेली तरी प्रश्न वैध दारूचा फक्त काही गावांपुरता सीमित होईल (याचे कारण देशी दारूचे लायसन्स तुलनेत कमी असून नवीन दिले जात नाहीत).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा