शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

३ हजार ऊस दरापासून शेतकरी दूरच

सतारा : परतीचा पाऊस, महापूर आणि अतिवृष्टी यामुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा गाळप हंगाम कमी चालणार आहे. उस कमी असल्यामुळे कारखाना जास्त दिवस चालवण्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी सुमारे 3 हजार रुपये दर (ऊस तोडणी वगळता) काढला आहे. मात्र, दोन महिने लोटल्यानंतर सातारा जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी आपला दरच जाहीर केला नाही. तर ज्या कारखान्यांनी दर जाहीर केला आहे तो 2500 ते 2800 च्या आसपास आहे. जर कोल्हापूर व सांगलीला कमी रिकव्हरी असताना 3 हजार रुपये दर देण्यास परवडते तर सातारा जिल्ह्यातील कारखान्यांना का परवडत नाही? असा प्रश्‍न ऊस उत्पादकांनी उपस्थित केला आहे.

ज्या कारखान्यांनी दर जाहीर केले आहेत, त्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. अनेक कारखान्यांनी दरच जाहीर केला नसल्याने शेतकर्‍यांना पैसे मिळाले नाहीत. पहिल्या टप्प्यात दर जाहीर करून पुढील टप्प्यात 100 ते 200 रुपये अधिक देणार असल्याचे कारखान्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कारखान्यांकडून एफआरपी कायद्याला हरताळ फासला असून यावर साखर आयुक्‍त कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे गाळप हंगामास उशिरा सुरुवात झाली. याचा फटका कारखान्यासह शेतकर्‍यांनाही बसणार आहे. उशिरा तोड सुरू झाल्याने उसाचे वजन कमी होत आहे. त्यामुळे एका खेपेला किमान 3 टन वजनाची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. तसेच ज्या शेतकर्‍यांनी उस घातला आहे, त्यांना सरासरी 2500 ने पहिला हप्‍ता खात्यावर जमा केला आहे. एफआरपीचे नेहमीप्रमाणे यंदाही तुकडे पडणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सातारा जिल्ह्यात फक्‍त कराड व पाटण तालुक्याला महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यापेक्षा जास्त नुकसान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे झाले आहे. असे असताना या जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाला चांगला दर दिला आहे. जयसिंगपूर येथे झालेल्या बैठकीत प्रति टन 3 हजार रुपये दर मिळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला तेथील कारखानदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदा साखरेलाही चांगला दर मिळाला असल्यामुळे थोडा जास्त दर देण्यास कारखान्यांना काहीच फरक पडत नाही.

इतर कारखान्यांनीही 3 हजार रुपये द्यावा
सह्याद्री साखर कारखान्याने 2 हजार 855 दर जाहीर केला आहे. दुसर्‍या टप्प्यातही काही रक्‍कम शेतकर्‍यांना देण्यात येणार असल्याने सह्याद्रीची एफआरपी (उस तोडणी वगळून) ही 3 हजारांवर जाणार असल्याची शक्यता आहे. इतर कारखान्यांनीही आपले दर जाहीर केले आहे. मात्र, ते या दरापेक्षा सुमारे 200 रूपयांनी कमी आहे. आता उसतोड अंतिम टप्प्यात असून इतर कारखान्यांनी सह्याद्रीचा आदर्श घेवून शेतकर्‍यांना प्रतिटन 3 हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...