गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

*उत्साहाचा खळखळता झरा: प्रा. पी. डी. पाटील.*निवृत्ती? छेजगण्याची नवी आवृत्ती!!!

*उत्साहाचा खळखळता झरा: प्रा. पी. डी. पाटील.*

निवृत्ती? छे
जगण्याची नवी आवृत्ती!!!
प्रत्येक माणसाला दोन प्रकारची वय असतात: एक शारीरिक वय व दुसरे मानसिक वय. असेच 25 वर्षे मानसिक वय असलेले प्राध्यापक पी. डी. पाटील सर शारीरिक वयाच्या 58 व्या वर्षी आपल्या दैदिप्यमान प्रदीर्घ सेवेतून 31 जानेवारी, 2021 रोजी निवृत्त होत आहेत.
    प्रा. पी. डी. पाटील सर यांच्याविषयी बोलावे तितके कमीच आहे. ते आणि मी, आम्ही एकाच वांग खोऱ्यातील. त्यांच्याविषयी प्रकट होण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. एखादी व्यक्ती किती वर्षे जगली यापेक्षा ती कशी जगली याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाटील सर म्हणजे एक अष्टपैलू, सदाबहार, निगर्वी, उत्तम संघटक, अजातशत्रू असं व्यक्तिमत्व आहे. नोकरी करण्याबरोबरच समाजाची बांधिलकी त्यांनी पहिल्यापासूनच जपलेली आहे.
      आपण ज्या मातीमध्ये जन्म घेतला त्या मातीसाठी आणि त्या मातीतील सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे या एकाच देहातून सरांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे.
   ज्याप्रमाणे दुधात साखर विरघळून गोडवा निर्माण होतो, त्याप्रमाणे काही माणसे आयुष्यात साखरेसारखी विरघळतात. पी. डी. पाटील सर म्हणजे एक उत्साहाचा खळखळता झरा.लोकांच्या सुखामध्ये नेहमीच वर्दळ असते पण प्रत्येकाच्या दुःखात  झटणारे व्यक्तीमत्व म्हणजे पी. डी. पाटील सर. समाजात दुःख देणार्‍यांची संख्या आज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या दुःखरुपी वाळवंटात सापडलेला थंडगार झरा म्हणजे पी. डी. पाटील सर. सरांना मी सन 2004 पासून ओळखत आहे.पण या इतक्या वर्षात त्यांनी जाणीवपूर्वक मला कधीच दुःख दिले नाही. वरिष्ठपणाचा त्यांनी कधीही आव आणलेला नाही. फळ देणारे झाड नेहमी झुकलेले असते पण ते शोभून दिसते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात नेहमीच नम्रता दिसून आली.महाविद्यालयात इतकी वर्षे नोकरी करूनही त्यांनी नवीन लोकांना जाणीवपूर्वक त्रास कधीच दिला नाही, उलट अडचणीच्या वेळी त्यांनी वेळोवेळी मदतच केली.ते प्रत्येक वेळी बोलायचे की आपण काम करत असताना पाठीमागे बोलणाऱ्यांची संख्या खूप असते पण आपण तिकडे कधीही लक्ष द्यायची नाही.उलट अधिक जोमाने काम करत राहायचे मग आपल्या कामातून त्यांना आपोआप उत्तर मिळत जाते. अडचणीच्या वेळी शांत डोक्याने कसे काम करावे हे त्यांच्याकडून खूप शिकावयास मिळाले. इतक्या वर्षात ते कधीही धीर-गंभीर झालेले पहावयास मिळाले नाही. त्यांनी कधीच दुसऱ्यांचे खच्चीकरण केले नाही उलट वेळोवेळी आम्हाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला.
    संघटन कौशल्य कसे असावे हे त्यांच्याकडूनच शिकावे.प्रीतिसंगम हास्य क्लबच्या मदतीने त्यांनी समाजातील लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.वर्गातील तास असो, महाविद्यालयातील कोणताही कार्यक्रम असो, नाहीतर समाजातील काहीही कार्यक्रम असो, या विनोदवीराला तिथे खूप मागणी असते.महाविद्यालयातील सर्व कार्यक्रमात आम्हाला त्यांनी डोळ्यांच्या कडा ओल्या होईपर्यंत, गाल दुखेपर्यंत हसवून एक प्रकारे आमच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.
सहलीचे नियोजन कोणी करावे तर उत्तर मिळते पी. डी. पाटील सर. सहलीसाठी प्रथम खिशातून पैसे काढणारे तेच असतात. त्या सहलीचे उत्तम नियोजन कसे करावे हे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले.मी त्यांच्याबरोबर अनेक वेळा सहलीला गेलो आहे त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडात पी. डी., पी. डी. हेच शब्द असतात,म्हणजे ते किती लोकमान्य नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आहे आपणास कळून येते.
     फिटनेसचा दर्जा काय असावा हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच समजते. आज आपल्यातून ते निवृत्त होत आहेत यावर आपला अजिबात विश्वास बसत नाही. त्यांना व्यायामाची आणि ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच गड त्यांनी सर केलेले आहेत.शरीर संपत्ती ही सर्वांगसुंदर संपत्ती असते, याची त्यांना पुरेपूर जाण आहे.
  "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ll
त्यांनी आपली सेवा इमानेइतबारे केली.क्रीडा क्षेत्राचे शिक्षक असल्याने त्यांनी अनेक राज्य व देश पातळीवर असे खेळाडू घडविले आहेत. आजही त्यांचे अनेक उच्च पदावरील विद्यार्थी त्यांची आठवण काढतात, यातूनच त्यांची शिक्षक म्हणून चांगली ओळख तयार होते. विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीच्या वेळीही त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे.आपण समाजामध्ये निस्वार्थीपणे चांगले काम केले की  निसर्गाकडूनही परतफेड म्हणून आपल्याला चांगले फळ मिळते.सरांचे दोन्ही चिरंजीव चांगल्या पदावरती सध्या कार्यरत आहेत. पाटण तालुका कबड्डी असोसिएशन तसेच काकासाहेब चव्हाण महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना यासारख्या अनेक संघटनांमध्ये सर सध्या कार्यरत आहेत.
  नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी माणसे तुमच्या सारखी माणसं फारच कमी असतात.अशा या सदाबहार प्रा. पी. डी.पाटील सरांना दीर्घायुष्य लाभो आणि उर्वरित त्यांचे आयुष्य उत्तरोत्तर बहरत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना!!!!

 
शब्दाकंन ;  प्रा. सुरेश यादव.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...