सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला घरी राहून देशाला सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण घरात बंदिस्त आहे. अनेकजण आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. तर अनेकजण वाचन, लेखन, चिंतन करत आहेत. असे असतानाच साताऱ्याचे खासदार आणि माजी प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पाटील हे मात्र मिळालेला वेळ शेतीच्या कामात सत्कारणी लावत आहेत.
श्रीनिवास पाटील यांनी फेसबुकवर फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये ते एका हाडाच्या शेतकऱ्याप्रमाणे शेतात काम करत आहेत. हे फोटो पोस्ट करताना खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.
त्यात त्यांनी असे लहिले आहे की, “शेतातली माती शेतकऱ्याच्या मनात खोलवर उतरुन सतत संवाद साधत असते. कृषीसंस्कृतीची मुळं आपल्या मनात ही अशी घट्ट खोलवर रुजलेली आहेत, ती यामुळेच. मी शेतातच राहत असल्याने शेताची ही हाक मला सतत कानी येत असते. शेतात दिवसातून एकदा तरी फेरफटका मारल्याशिवाय दिनक्रम पुर्ण होत नाही. सध्या देशावर ओढावलेलं कोरोना विषाणूचं संकट मोठं आहे. अशावेळी शेती व शेतकऱ्यांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने कळतंय.
तसेच कारखाने, मोठमोठी ऑफीसेस असं सगळं इथून तिथपर्यंत बंद आहे. उद्योजक, कामगार, गरीब, श्रीमंत असे सर्वजण घरातच आहेत. या काळात हा जगाचा पोशींदा आज सर्वांचा खऱ्या अर्थाने तारणहार झालाय. या कठीण काळात देखील आपण उपाशीपोटी नाही याचे श्रेय सर्वस्वी शेतकरी बांधवांचं आहे. एकीकडे वैद्यकीय व पोलीस यंत्रणा कोरोनाशी लढत असताना दुसरी बाजू बळीराजाने आपल्या मजबूत खांद्यावर टिकवून ठेवली आहे. म्हणूनच आपण शेती,माती आणि शेतकरी बंधू भगिनींप्रती कृतज्ञ असायलाच हवं. बळीराजाला शतशः वंदन”.
दरम्यान श्रीनिवास पाटील हे माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र आहेत. दोघेही शेतकऱ्याची मुल असल्याने दोघांनाही शेतीबाबत प्रेम आहे. शरद पवारांना तर शेतीतली खडांंखडा माहिती असल्याने पवारांची महती ही कृषीतज्ञाला काही कमी नाही. मात्र त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील हे देखील शेतीत पारंगत असल्याचं आल त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे समोर आल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा