शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपाला 'समृद्धी'च्या बैठकीत शेतकऱ्यांची पुष्टी

नाशिक : समृद्धी महामार्गातील गैरव्यवहाराबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस सरकार विरोधात विधानसभेत केलेल्या आरोपांची चर्चा होत आहे. आता स्थानिक पातळीवरही असेच आरोप सुरू झाले आहेत. आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी समृद्धी महामार्गातील अडचणी संदर्भातील बैठकीत शेतकऱ्यांनी रस्त्यात नसलेली घरे रस्त्यात दाखविली गेली, तर मातीची घरे कॉंक्रिटची दाखविल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली.
समृद्धी मार्गाच्या कामाबाबत विविध मागण्या करतानाच, एका शेतकऱ्याने थेट गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उपोषणाचा इशारा दिल्याने बैठक गाजली. नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार अॅड. कोकाटे यांच्या मध्यस्थीतून इगतपुरी व सिन्नर तालुक्‍यातील समृद्धीबाधित गावांतील शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत शुक्रवारी बैठक झाली.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, समृद्धी कक्षाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, सविता पठारे, अधीक्षक अभियंता राजेश निघोट आदींसह बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीत शेतकऱ्यांनी समृद्धीविषयक नाराजीचा पाऊस पाडला. दैनंदिन अडचणीशिवाय गैरव्यवहाराचे आरोप झाले.

'समृद्धी महामार्गासाठी शेतातील माती-मुरूम काढला जातो. ट्रक, डंपरच्या वाहतुकीमुळे गावोगावचे रस्ते पूर्ण खचून गेले आहेत. अद्याप रस्ता सुरू नाही तोच गावोगाव शेती गावठाण वेगळे पडले आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना वळसा घालून रस्ता ओलांडून शेतात जावे लागते. ठेकेदार ऐकत नाही. दादागिरी करून शेतकऱ्यांच्या विरोधात तक्रारी नोंदविल्या जातात. रस्त्यासाठी बऱ्याच ठिकाणी खदानी खोदून त्यातून प्रमाणापेक्षा जास्त गौण खनिज काढले जाते. त्यामुळे गावोगाव या खदानी यमराज झाल्या आहेत. त्या धोकादायक खदानी बुजविल्या जाव्यात, तत्पूर्वी कुंपण करून त्या बंदिस्त तरी कराव्यात,' अशा तक्रारी बैठकीत करण्यात आल्या.

बैठकीत लक्ष्मीकांत शिंदे या शेतकऱ्याने थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपाला पुष्टी देणारे आरोप करीत जिल्ह्यात जमीन संपादनात मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप केला. रस्त्यात नसलेली घरे रस्त्यात दाखविली गेली. मातीची घरे कॉंक्रिटची दाखविल्याचा आरोप करीत चौकशीसाठी उपोषणाचा इशारा दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी मांढरे यांनी समस्यांबाबत प्रांताधिकाऱ्यांनी दर महिन्याला बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश देताना स्थानिक तक्रारीबाबत नियमित आढावा बैठका घेऊन पाठपुराव्याचे आश्‍वासन दिले.

समृद्धी महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनाचे पैसे दिले हे ठीक आहे. पण या कामामुळे गावोगावचे रस्ते खराब झाले आहेत. धुळीमुळे पिकांचे नुकसान होते आहे. रस्त्यानंतर अनेक गावांतील नागरिकांना त्यांच्या शेतावर जाता येणार नाही. दळणवळण तुटेल. त्यामुळे रस्त्याखाली अंडरपास्ट करावेत, नियमित तक्रार निवारण बैठका घ्याव्यात, असे महत्त्वाचे निर्णय झाले. -अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...