शनिवार, २४ जुलै, २०२१

*खा.श्रीनिवास पाटील दिल्लीतून थेट साता-यात*लोकसभेचे अधिवेशन सोडून अतिवृष्टी ठिकाणची केली पाहणी

*खा.श्रीनिवास पाटील दिल्लीतून थेट साता-यात*
लोकसभेचे अधिवेशन सोडून अतिवृष्टी ठिकाणची केली पाहणी
कराड कुमजाई पर्व वृत्तसेवा 
 कराड : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली येथे गेलेल्या खा.श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी पहाटेचे विमान पकडून सातारा गाठला. अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यांनी महाबळेश्वर, वाई, कराड तालुक्यातील बाधित ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.
    अतिवृष्टी व पूरस्थितूमुळे सातारा जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेकजण दगावले आहेत. शेतीसह रस्ते, पूलांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढावलेल्या परिस्थितीचे गंभीर स्वरूप पहाता खा.श्रीनिवास पाटील हे दिल्लीहून थेट साता-यात आले आहेत. सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून खा.पाटील हे दिल्ली येथे उपस्थित राहिले होते. तेथून मुसळधार पावसामुळे साता-यातील परिस्थिती पाहून ते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत होते. मात्र नेहमीच नागरिकांच्या सानिध्यात राहणारे खा.पाटील हे नागरिकांवर ओढावलेल्या बिकट प्रसंगामुळे अस्वस्थ होते. त्यांनी शनिवारी पहाटेचे विमान पकडून पुणे मार्गे सातारा गाठला. साता-यात आल्यानंतर महाबळेश्वर, वाई, कराड तालुक्यातील बाधित गांवाना भेटी दिल्या.
     महाबळेश्‍वर येथे आ.मकरंद पाटील यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित रहात तालुक्यातील जीवित हानी व मालमत्तेचे झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. महाबळेश्वर तालुक्यातील बरेच रस्ते व पूल वाहून गेल्याने अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत.  रस्ते दुरुस्त करावे, गावांशी लवकर संपर्क साधावा, लोकांपर्यंत पोहचावे. वीजपुरवठा तातडीने सुरूळीत करावा. आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रेशनिंग व्यवस्था सुरळीत कराव्या अशा सूचना यावेळी प्रशासनातील अधिकारी वर्गाला त्यांनी केल्या. यावेळी आ.मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी, बाळासाहेब भिलारे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, राजूशेठ राजापूरे, प्रविण भिलारे, श्री किसन शिंदे, गट विकास अधिकारी घोलप आदी उपस्थित होते.
      त्यानंतर वाई तालुक्यातील कोंढावळे (देवरुखवाडी), मेणवली, आभिपुरी, जांभळी व कराड तालुक्यातील पाली येथे भेट देऊन नुकसान झालेल्या परिसराची पहाणी केली. संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचे आश्वासन देऊन पिकांचे व घराच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल असे आश्वासन त्यांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...