बहुमत तुमचे सरपंच आमचा ! सरपंचपदाची लॉटरी कोणाला लागणार?
तळमावले / प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सरपंचपदासाठी "धुमशान' सुरू झाले आहे. सरपंचपदाचे आरक्षण आज शुक्रवार (ता. 29) जाहीर होणार आहे. आपल्या गावाला कशा प्रकारचे आरक्षण पडणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. बहुमत असलेल्या गटाकडे जर आरक्षित उमेदवार नसेल तर सरपंच होणार विरोधी गटाचा हे मात्र नक्की त्यामुळे नवीन निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसह पॅनेलप्रमुख व मतदारांमध्येही धाकधूक वाढली आहे.
यावर्षी ग्रामपंचायत निवडणुकांनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.काही ग्रामपंचायती मतदानापूर्वीच बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या.काही गावात निवडणूक झाली होती. निवडणूक झालेल्या गावांत निवडून आलेल्यांपैकी आरक्षण कसे पडणार? याबाबत अनिश्चितता असल्याने जास्त जागा निवडून आणणारेही सुद्धा गोंधळात सापडले आहेत, तर काही ठिकाणी काठावर बहुमत असले तरी सर्व आरक्षणाचे उमेदवार निवडून आलेले नाहीत. याची खरी गंमत होणार आहे. तर काही ठिकाणी बहुमत एका गटाकडे आणि सरपंच मात्र विरोधी गटाचा, असेही विरोधी चित्र रंगणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय पातळीवर न लढता त्या स्थानिक पातळीवर आघाड्या करूनच लढविल्या गेल्या असल्या तरी निकालानंतर मात्र त्याला पक्षीय तसेच तालुका पातळीवरील गटाचे स्वरूप आले आहे. तालुका पातळीवरील नेतेमंडळी व त्यांची समर्थक मंडळी "आमच्याच जास्त ग्रामपंचायती आल्या' असे ढोल वाजवत सांगत आहेत. त्यामुळे मूळ निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या मात्र दुपटीने वाढली आहे. आता सरपंचपदाचे आरक्षण असल्याने हा वाद आणखीन वाढणार आहे. त्यामुळे आरक्षणानंतरही हे फोडाफोडीचे व वादविवादाचे राजकारण याचा खेळ रंगणार असून, त्यातून वादही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावकारभाऱ्याच्या सत्तेसाठीच्या हालचाली गतिमान होणार आहेत.
तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. आता आरक्षणानंतर सरपंचपदाची निवडही खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडले जावे व गावच्या विकासासाठी प्रयत्न करावा, अशी माफक अपेक्षा मतदार व ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. एकूणच, या वेळेस बहुमतापेक्षा सरपंचपदाचे आरक्षणच पडणार "लय भारी' हेच खरे.
जीव टांगणीला !
निवडणुका म्हटले की, जय - पराजय आलाच. परंतु ग्रामपंचायत लढवणे म्हणजे खूपच कठीण काम आहे, याचा प्रत्यय भल्या-भल्यांना आला आहे. परंतु, 29 तारखेला आरक्षण सोडतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. आरक्षण काय पडणार? कोणत्या गटाला सरपंचपदाची लॉटरी लागणार? या कोलाहलाने व नवीन गाव कारभारी कोण होणार? या विचाराने नवनिर्वाचित सदस्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. सरपंच निवडीनंतर मात्र तालुका पातळीवरील नेत्यांचे दावे-प्रतिदावेही खोटे ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
पाटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 234
अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 20, महिला 10, खुला 10,
अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 0, खुला 1,
नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 63, महिला 32, खुला 31,
सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 150, महिला 75, खुला 75,
एकुण सरपंचांची पदे 234 आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा