राज्यातील १५ हजार प्राध्यापक आठ महिन्यापासून विना वेतन
सीएचबी प्राध्यापकांची तातडीने भरती करा
सातारा दि.15 मागील मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद असून शैक्षणिक वर्षातील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा करार संपुष्टात आला आहे. यामुळे तुटपुंजे मिळणारे मानधनसुद्धा बंद असून राज्यातील जवळपास १५ ते २० हजार प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली असून तातडीने प्राध्यापकांची भरती करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी आज शासनाकडे केली आहे
याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.
राज्यात तासिका पद्धतीने काम करणारे प्राध्यापक नेट, सेट, एमफिल, पीएचडी पात्रताधारक असून यातील अनेकजण रोजगार नसल्याने पडेल ते काम करीत आहेत. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना इतर राज्यात २५ ते ३० हजार रुपये मानधन मिळते परंतु महाराष्ट्रात मात्र तासिकेनुसार मानधन मिळते जे अत्यंत तुटपुंजे आहे. एप्रिल व मे महिन्यात सदर मानधन मिळत नाही. मागील सरकारमध्ये प्राध्यापक भरतीचा निर्णय झाला होता त्याबाबतची पुढील कार्यवाही करणे सरकारने अपेक्षित असतांना भरतीही होत नाही व मानधन वाढही होत नाही त्यातच तासिका तत्वावरचा करार संपुष्टात आल्याने आता या प्राध्यापकांनी जगावे कसे असा प्रश्नही अनिल बोरनारे यांनी शासनाला विचारला आहे
सध्या महाविद्यालये बंद असली तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्यात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा अतिरिक्त ताण नियमित प्राध्यापकांवर पडत आहे. त्यामुळे तात्काळ प्राध्यापकांची भरती करावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा