रविवार, २६ मार्च, २०२३

स्पंदन दिवाळी अंक व सेल्फी विथ गुढी स्पर्धेचे निकाल जाहीर

स्पंदन दिवाळी अंक व सेल्फी विथ गुढी स्पर्धेचे निकाल जाहीर

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने आयोजित केलेल्या दिवाळी अंक आणि सेल्फी विथ गुढी या स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दिवाळी अंकासाठी महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा अखंडपणे जपण्यासाठी दिवाळी अंक स्पर्धा घेतली होती. तसेच ‘चला संस्कृती जपूया’ ही टॅगलाईन घेवून ‘सेल्फी विथ गुढी’ ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. या दोन्ही स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
दिवाळी अंक स्पर्धेत सर्जनशीलतेचा नवाविष्कार, ग्रामसेवा, गावगाथा, सुभाशित, रंगतदार, धगधगती मुंबई गुंफण, शब्द शंकरपाळी, गझल अमृत, शब्द शिवार, अवतरण-सकाळ, आयुष्मान, कृष्णाकाठ या अंकांना उत्कृष्ट दिवाळी अंकांचा सन्मान मिळाला आहे. या विजेत्यांना सन्मानचिन्ह, ग्रंथ आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
तसेच ‘सेल्फी विथ गुढी’ या स्पर्धेत सौ.ऐश्वर्या प्रसाद काटकर (सातारा), चैतन्य भास्कर करमरकर (सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय, जयवंत निवृत्ती सावंत (मुंबई) आणि विक्रम विष्णू करपे (देवाची आळंदी) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. सौ.कविता सतीश कचरे (तळमावले) यांना उत्तेजनार्थ तर डाॅ.बलराज पाटील यांना विशेष पारितोषिक देण्यात आले आहे. या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक गौरवचिन्ह, पुस्तक आणि अभिमानपत्र देण्यात येणार आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने शेकडो नावीण्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार इ.नी गौरवण्यात आले आहे. दिवाळी अंक स्पर्धा व सेल्फी विथ गुढी या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना लवकरच एका दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

शनिवार, ४ मार्च, २०२३

वैराटवासी महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचे देहावसान.

वैराटवासी महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचे देहावसान.
श्री श्री 1008 प.पु.महामंडलेश्वर वैराटवासी स्वामी आबानंदगिरी महाराज (श्रीपंचदशनाम जुना भैरव आखाडा) श्री क्षेत्र वैराटगड यांचे शुक्रवार दि. 3 मार्च, 2023 रोजी सायंकाळी 7.25 वाजता देहावसान झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेमध्ये घालवले. अध्यात्माबरोबरच ‘‘मानवसेवा हीच ईश्वर सेवा’’ हे ब्रीद घेऊन जनसेवेचा नंदादीप त्यांनी अखंड तेवत ठेवला.
वैराटवासी आबानंदगिरी महाराज यांचा जन्म 15 मार्च, 1953 रोजी झाला. वडील सखाराम बळवंत पांचाळ व आई लक्ष्मीबाई यांच्या संस्कारात त्यांची जडणघडण झाली. सातारा जिल्ह्यातील वाझेगाव ता.फलटण हे आबानंदगिरी महाराजांचे मुळ गाव.
19 मे 1975 पासुन ते प.पु. स्वामी गगनगिरी महाराजांचे सान्निध्यात आले. गगनगड येथे ते गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला गेले आणि त्यांचे पाईक झाले. सन 1980 साली प.पु. स्वामी गगनगिरी महाराजांच्या कृपाशिर्वादाने बिंबातुन प्रतिबिंब शोधण्यासाठी स्वामी आबानंद कृष्णेच्या जवळ असलेल्या वैराटगडावर आले, ते लोकांतातुन एकांतात आले व एकांतात ध्यान धारणा करु लागले. अनेक वर्ष साधना केल्यानंतर आपल्या दिव्य साक्षात्कारांचा उपयोग दुःखी पिडीत जनतेसाठी करावा ही इच्छा जागृत झाली व महाराजांनी एकांतातून लोकांतात येण्याचे ठरविले.
1982 साली श्री वैराटगडावर शिवपिंड भूगर्भातून काढून श्री वैराटेश्वराची स्थापना केली. 1987 साली प.गगनगिरी महाराजांना वैराटगडावर आणले व त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत पावन केली. 15 मार्च, 1988 रोजी गगनगिरी महाराजांचे कृपाशिर्वादाने स्वामी आबानंदगिरी महाराजांनी परमशांतीधाम वृद्धाश्रम ट्रस्टची मुहुर्तमेढ रोवली. सुरवातीचे काही दिवस अगदी खडतर होते. दहा खोल्या उभ्या राहील्या. स्वामी महाराजांच्या चौकस वृत्तीने कालांतराने बघता बघता दोन मजली इमारत या ठिकाणी उभी राहीली. आश्रमात वृद्धांची हरेक प्रकारे काळजी घेतली जाते. निराधारांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो. शांतीधाम वृद्धाश्रम नव्हे तर आपले कुटुंबच वाटते.
श्री क्षेत्र वैराटगडाच्या कुशीत वसलेल्या कापसेवाडी या ठिकाणी गावकऱ्यांनी दान केलेल्या भूमीत शिवदत्त मठाची स्थापना करून महाराजांनी पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य सुरु केले आहे. 2004 साली महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून निराधार, निराक्षित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी महायोगी गगनगिरी विद्यार्थी वसतीगृह स्थापन करून मुलांची निवासाची व भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली तर महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालयाची स्थापना करून पंचक्रोशीतील मुलांच्या शिक्षणाची उत्तम सोय महाराजांनी केली.
आळंदी येथे गगनगिरी भक्त निवासाची सोय, पंढरपुर येथे गगनगिरी भक्त निवास, तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे साधुसंतासाठी भक्त निवासाची सोय केली आहे. प्रवचनाच्या माध्यमातून महाराजांनी समाजजागृती व अंधश्रध्दा निर्मुलनाची कामे त्यांनी केली. महंत आबानंदगिरी दिंडीच्या माध्यमातून महाराजांचे मार्गदर्शनाखाली सुमारे पाचशे पेक्षा जास्त भाविक आळंदी पंढरपुरची वारी करतात.
स्वामी आबानंदगिरी महाराज ‘जय गगनगिरी’ साप्ताहिक चालवतात. संत गाडगेबाबा आणि स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानून महाराजांनी आपले जीवनक्रमण केले. त्यांच्या या कार्याला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मानाचा रायगड भूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. स्वामी विवेकानंदानी स्थापन केलेल्या विश्वधर्म संसदेचे ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. रायगड जिल्हा वारकरी महामंडळाचे ते उपाध्यक्ष होते. मिडीया एवम् पोलिस पब्लीक ट्रस्ट नवी दिल्लीचे ते अध्यक्ष होते. नवी दिल्ली येथे त्यांना राजीव गांधी ग्लोबल पुरस्कार 2010 ला मिळाला आहे.
प.पु. महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराजांनी अनेक रंजल्या गांजल्या उपेक्षित लोकांना आभाळ माया देण्याचे काम निस्वार्थ भावनेने केले. एवढे मोठे कार्य करून सुद्धा ते कायम प्रसिद्धी पासुन दुर राहिले. अनेक जण भक्तीचा मार्ग स्वीकारतात मात्र दगडात देव शोधताना त्यांना माणसांमधील देव त्यांना दिसत नाही परंतु स्वामी आबानंदगिरी महाराज त्याला अपवाद होते. निस्सीम भक्तीच्या मार्गाने जातानाच वृद्ध, दिनदुबळयांच्या सेवेला त्यांनी वाहून घेतले होते. अशा समाजसेवी सेवाव्रती तपस्वी व्यक्तीमत्वास विनम्र अभिवादन...!



शब्दांकन: श्री.जयवंत तरडे
मुख्याध्यापक, महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय
मो. 9767690087

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...